You are currently viewing एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी महेश सावंत यांची निवड

एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी महेश सावंत यांची निवड

सावंतवाडी /-

मुंबई येथील एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थेच्या संस्थापक ट्रस्टी सीता दळवी व रामचंद्र दळवी यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉ. नयन भेडा व लक्ष्मी अय्यर यांच्या मार्गदर्शनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात नेमळे येथील प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक महेश लाडू सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून प्रा. रुपेश पाटील यांची प्रमुख सल्लागारपदी निवड झाली आहे. तर फाऊंडेशनचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी (कार्यक्रम) सचिन कृष्णा मदने व उपाध्यक्ष (सदस्यत्व विकास) पदावर ज्योती रामगिरी बुवा (टोपीवाला हायस्कूल, मालवण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी चेतन अंबाजी बोडेकर तर सहसचिवपदी लक्ष्मण नारकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एस. आर. फाऊंडेशन ह्या संस्थेमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.

संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष महेश सावंत यांनी संस्थेविषयी माहिती देतांना सांगितले की, एस. आर. फाऊंडेशन ही संस्था फक्त शिक्षक सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा कोणीही व्यक्ती मग तो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या कोणत्याही गटातील असला तरी तो संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो. ही संस्था कोणत्याही प्रकारची शिक्षक संघटना नसून शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, म्हणून विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणारी ही संस्था आहे. संस्थेने ‘टीचर टॉक’ नावाचे अँड्रॉइड ॲप युजर्ससाठी निर्माण केले असून, सर्व प्रकारच्या शिक्षकांनी सदर ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे आणि स्वतःची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे. या ॲपच्या माध्यमातून राज्यभरातील इतर शिक्षकांशी संवाद साधता येणार असून आपले उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचण्याची ही सुवर्णसंधी सर्वांना उपलब्ध होणार आहे. ‘टीचर टॉक फोरमची’ स्थापना ही केवळ शिक्षकांचा विकास व त्यांना सन्मान मिळावा या उद्देशाने झालेली असून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा यातून होणार आहे. तसेच शैक्षणिक बातम्या आपणास ‘टीचर टॉक’ ॲपमध्ये पाहावयास मिळतात. सर्व स्तरातील शिक्षकांनी या ॲपचा लाभ घ्यावा आणि संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे, अशी आशा नूतन जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.

अभिप्राय द्या..