तळेरे /-
तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उपक्रमशिल शिक्षक युवराज पचकर आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांचा समावेश आहे.
नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, 1982 पासून अमरहींद मंडळात श्रवणभक्तिला सुरुवात केली. ती आजतागायत सुरु आहे. या दरम्यानच्या काळात सर्वच क्षेत्रातील भव्य दिव्य माणसांना ऐकता आले, भेटता आले. त्या व्यक्ती मला पुन्हा तळेरेच्या घरी तुमच्या ‘छंद वहीत’ सापडल्या. यामुळे आठवणी जाग्या झाल्या, आनंद देऊन गेल्या. मन आणि आठवणी पुन्हा भूतकाळात घेवून गेल्या, याचे श्रेय तुमच्या छंदोपासनेला असल्याचे सांगितले.
उपक्रमशील शिक्षक युवराज पचकर यांनी अक्षरघराला भेट देत निकेत पावसकर यांना फेटा बांधून शुभेच्छा पत्र दिले. तर सातारा येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांनीही या अक्षर घराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्राचार्य सुनील ढेंबरे, छायाचित्रकार अनिल देसाई, सुशांत तुपे, आशिष वीर, विजय सवादेकर, तेजस बोर्गे, अभिजीत गायकवाड, ऋषिकेश माळी आदी उपस्थीत होते.
यावेळी त्यांनी संपूर्ण संग्रह पाहिला. या संग्रहामागील कल्पना जाणून घेतली. यावेळी बोलताना डॉ. संदीप डाकवे म्हणाले की, आपला संग्रह पाहून मन तृप्त झाले. आपल्या संग्रहाचे कला दालनात रुपांतर झालेले पहायला नक्की आवडेल, अशी आशा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी निकेत पावसकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.