सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामध्ये तसेच पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यासंदर्भात डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांनी ) तसे आदेश सर्व गटशिक्षण अधिकारी, प्राचार्य तसेच मुख्याध्यापक यांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. १५ फेब्रुवारी पर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळातील ९ वी ते १२ वीचे वर्ग बंद राहतील.

शाळा बंद असल्यातरी शाळांमधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमित शालेय कामकाजाच्या वेळेत शाळेत पुर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करायचे आहे. तसेच ऑनलाईन अध्यापन करणे शक्य नसले तेथे (मोबाईल रेंज नसलेल्या ठिकाणी) कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधत सर्व नियमांचे पालन करुन गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या गृहभेटीला जाताना शाळेच्या हलचाल रजिस्टरमध्ये सुस्पष्ट नोंद करावी. मुख्याध्यापकांनी गृहभेटीचे वस्तुनिष्ठ नियोजन करावे. शाळांतील शिक्षक, विद्यार्थी / पालक, यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विषयतज्ज्ञ, साधनव्यक्ती यांना समाविष्ट करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासाविषयी या सर्वांनी पाठपुरावा करावा.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करावे. विविध शैक्षणिक बोर्डाकडून १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम सदर कालावधीत शाळा बंद असल्या तरी – ऑनलाईन शिक्षण चालू असणार आहे. तसेच शालेय वेळेत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी १०० टक्के उपस्थित राहून प्रशासकीय कामकाज व अध्ययन, अध्यापन व लसीकरणासाठी शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य राहील. इ. ५ वी ते १२ वी चे ऑनलाईन शिक्षण सुरळीतपणे चालू राहील व १०० टक्के मुले ऑनलाईन शिक्षणासाठी • उपलब्ध राहतील याची दक्षता सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी घ्यावी. इ. १० वी, १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाच्या परीक्षा विषयक कामकाजासाठी उपस्थित राहण्याची मुभा असेल.

गटशिक्षण अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषयतज्ज्ञ, साधन व्यक्ती, मोबाईल टिचर यांच्याकडून कामकाजाचा आढावा तसेच विद्यार्थी अभ्यासाचा आढावा घेऊन दैनंदिन अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा. तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक प्रामाणिक प्रयत्न करावेत. मुख्याध्यापक व शिक्षकांनी वेळोवेळी विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधावा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रयत्न करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page