मसुरे /-
गेले दोन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसामुळे मसुरेसह इतर गावातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. रमाई नदी तसेच ओहळाना पाणी आल्याने मागवणे, बांदिवडे, बागायत, वेरली, देऊळवाडा या भागातील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तसेच मसुरे कांदळगाव, मसुरे बागायत, मसुरे मार्गाचीतड या मुख्य रस्त्यावरती काही ठिकाणी पाणी आले असल्याने रस्त्यावरील वाहतूक काहि तास खोळंबली होती.
गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे बागायत, वेरली, देऊळवाडा, मसुरे या भागातून वाहणाऱ्या रमाई नदीचे पात्र पाण्याने दुथडी भरून वाहत असल्याने भातशेतीत पाणी शिरले. शेकडो हेक्टर भातशेती भुईसपाट होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. मसुरे सहित बांदिवडे भगवंतगड, वेरली, देऊळवाडा,मागवणे,आदी भागांमध्ये भात शेती मध्ये पाणी शिरले असून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यावर कृषी विभागाच्या वतीने तातडीने नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे.