मालवण /-
जिल्हा मुख्यालयात प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्याने प्रथमच गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी भराडी मंदीर येथे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दक्षता म्हणून गुरुवार दि. २४ सप्टेंबर ते गुरुवार दि. १ ऑक्टोबर या आठ दिवसांसाठी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
चौके गाव आजपर्यंत कोरोनामुक्त गाव राहिले होते. ग्रामपंचायत पातळीवर केलेल्या उपाययोजना आणि निर्णयामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या या गावातील ओरोसमध्ये कामाला असलेला एक प्रशासकीय अधिकारी मंगळवारी कोरोनाबाधित मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर सायंकाळी येथील श्री. भराडी मंदिरात ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदरील रुग्ण बाजारपेठेपासून जवळच मिळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत बाजारपेठ बंद राहणार आहे. या बैठकीला सरपंच राजन गावडे, ग्रामसेवक आशोक पाटिल, व्यापारी संघ अध्यक्ष नंदु राणे, बिजेंद्र गावडे, नाना देसाई, अविनाश गावडे, बबन आंबेरकर, मोहन गावडे तसेच व्यापारी संघाचे सदस्य, ग्रा. पं. दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.