सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या योगायोगावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत,गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे राज्याचे तीन मंत्री आज दि.२६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षाचे मंत्री प्रथमच एकाचवेळी जिल्ह्यात येत आहेत. या बॅंकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे राणेंच्या विरोधात थेट तीन मंत्री रिंगणात उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रचाराप्रमुखावर हल्ला झाल्याने तणावाचे वातावरण आहे. या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे पोलिस तपास कसा होणार, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दोन्ही मंत्री आज २६ ला विमानाने सकाळी चिपी विमानतळ येथे उतरणार आहेत. तेथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करीत सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे पोहोचणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत आज २६ ला रत्नागिरी येथून मोटारीने कै. श्रीधर नाईक चौक, शिवसेना संपर्क कार्यालयाजवळ, कणकवली येथे वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयालयाकडे येणार आहेत.
अजित पवार देणार आरोपांना उत्तर सतिश सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या आरोपांना अजित पवार आणि अन्य मंत्री उत्तर देणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे उमेदवार तथा अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे दिली.आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी शनिवारी पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, प्रमोद धुरी, अशोक दळवी, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, ”महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असलेल्या जिल्हात बँक पुन्हा चांगल्या पद्धतीने कामकाज करत राहावी यासाठी ती चांगल्या लोकांच्या हातात जायला हवी. महाविकास आघाडी हाच यासाठी पर्याय आहे. धन शक्तीच्या माध्यमातून ही जिल्हा बँक चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये यासाठी सहकारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रविवारी अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या सभेत संपर्कप्रमुख बंटी उर्फ सतेज पाटील त्याचबरोबर आमदार केसरकर, शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत त्याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
