शहरातील नागरिक सोडून इतर मृत कोरोना व्यक्तींचे शव स्मशानभूमीत दहन करण्यास आमचा विरोध :-नगराध्यक्ष ओंकार तेली

शहरातील नागरिक सोडून इतर मृत कोरोना व्यक्तींचे शव स्मशानभूमीत दहन करण्यास आमचा विरोध :-नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /-

कुडाळ शहरातील स्मशानभूमीत कुडाळ शहरा व्यतिरिक्त बाहेरील कोणतेही कोरोनाचे मृतदेह अंत्यविधी करण्यास आपला ठाम विरोध असल्याचे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या मध्यमातून सांगितले आहे.या प्रसिद्धीपत्रकात तेली यांनी म्हटले की, ओरोस प्राधिकरण विभागामध्ये असलेल्या प्राधिकरणाच्या आरक्षित भूखंडावर असलेल्या स्मशानात मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करणार असल्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला होता. त्या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्याने परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने ओरोस येथील स्मशानशेड अन्यत्र हलविण्याची मागणी स्थानिकांमधून करण्यात आली होती.

सोमवारी रात्री ओरोस येथे विरोध झाल्याने आता कुडाळ तालुक्यातील अशा व्यक्तींचे शव कुडाळ स्मशानभूमीत दहन करण्यात यावे, असा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली.कुडाळात शहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तसेच कुडाळ शहरातील मुख्य स्मशानभूमी लगतही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ शहरातील नागरिक सोडून इतर मृत व्यक्तींचे कुडाळ येथील स्मशानभूमीत दहन करण्यास आमचा विरोध आहे, असे ओंकार तेली यांनी म्हटले आहे. याबाबत योग्य तो निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावा. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला कोरोना काळात नगरपंचायतीने पूर्ण सहकार्य केले होते. परंतु ज्या गावातील व्यक्ती मृत झाली ते गाव आपल्या गावातील व्यक्तीचे दहन आपल्या गावात करू देत नसेल तर आम्ही का द्यावे, असा सवालही तेली यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे ओंकार तेली यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..