You are currently viewing वीज वितरणच्या कारभाराविरोधात आशिये ग्रामपंचायत जाणार न्यायालयात.;कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत..

वीज वितरणच्या कारभाराविरोधात आशिये ग्रामपंचायत जाणार न्यायालयात.;कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील आशिये गावच्या नळयोजना विद्युत पुरवठा अचानकपणे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला आहे. यासंदर्भात गेल्या वर्षभरात १ लाख ९० हजार रुपयांचा भरणा करून देखील विद्युत पुरवठा खंडित केला, जी बिलावर बाकी दिसते आहे, ते थकीत बिल गेली ५ वर्षे सरासरी पध्दतीने काढून ग्रामपंचायतीवर अधिभार लावण्याचं काम अधिकाऱ्यांनी केले आहे. रीडिंग न घेताच सरसकट वीजबिल आकारणी करण्याची गरज काय? त्यात ग्रामपंचायतची चूक काय? अवास्तव वीज बिलाला जबाबदार कोण? व्याज वाढले त्याची जबाबदारी कोणाची?अशी विचारणा कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना माजी उपसभापती महेश गुरव यांनी केली. यावर वेळीच तोडगा न काढल्यास वीज वितरण विरोधात आशिये ग्रामपंचायत न्यायालयात जाणार, असल्याचा इशारा महेश गुरव यांनी दिला आहे.

आशिये गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेचा विद्युतपुरवठा कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आला. या संदर्भात कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते त्यांची आशिये ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आशिये ग्रामपंचायत नळ योजना वीज मीटरचे बिल यापूर्वी कदापि थकीत नव्हते. आम्ही त्या त्या वेळी वीज बिल भरत होतो. गेले ५ वर्ष सरासरी बिल येत होते. त्यावेळी रीडिंग का घेतले नाही? आता सरासरी बिल लाखो रुपयांत आकारणी केली. ते बिल संबंधित रिडिंग घेणाऱ्या कंपनीकडून घ्यावे. त्याला आम्ही जबाबदार नाही. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार वीज वितरण कार्यालयाशी आम्ही केलेला आहे. त्याला कोणतेही उत्तर वीज कंपनीकडून आम्हाला देण्यात आलेले नाही. त्यामुळे तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू, असा इशारा वीज अधिकाऱ्यांना महेश गुरव यांनी दिला. त्यावेळी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी वीज बिल थकीत असलेल्या योजनांचा पुरवठा खंडित करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून आदेश आहेत, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

अभिप्राय द्या..