You are currently viewing खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीतील २ उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद,१३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात.

खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीतील २ उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद,१३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात.

कणकवली/-

कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६ – २७ या कालावधी करीता होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण १३ जागांसाठी तब्बल ३० उमेदवारांनी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले होते. परंतु सोमवारी दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी सहायक निबंधक सहकारी संस्था निवडणूक कार्यालय येथे झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातुन उमेदवारी दाखल केलेल्या एकूण २ उमेदवाराचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे खारेपाटण सोसायटी निवडणुकीकरिता आता १३ जागांसाठी फक्त २८ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीच्या आजच्या अर्ज छाननी कार्यक्रमात महेश शंकर राऊत व सत्यविजय सदाशिव भालेकर या दोन उमेदवारांचे अर्ज विरोधी उमेदवारांनी हरकत घेतल्यामुळे व ३ अपत्य असल्या कारणाने निवडणूक प्रक्रियेतून बाद ठरविण्यात आले. आता सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून ८ जागासाठी १६ उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी दि.३० नोव्हेंबर २०२१ ते १४ डिसेंबर २०२१ असा ठेवण्यात आला असून विद्यमान किती उमेदवार निवडणुकीतून अर्ज मागे घेणार आहेत. यावरून खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान सत्ताधारी विद्यमान पॅनल विरुद्ध गावकऱ्यांनी मिळून तयार केलेले विरोधी पॅनल यांच्या दरम्यान निवडणूक होणार असे सध्याचे चित्र असून एकास एक उमेदवार दिल्यामुळे दोन पॅनल तयार झाल्यामुळे निवडणूक होईल असे वाटत आहे. फक्त इतर मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून फक्त १ जागेसाठी प्रत्येकी ३ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. मात्र ऐनवेळी सामंजस्याने तोडगा काढून निवडणूक बिनविरोध व्हावी असा देखील सूर सभासदामध्ये व दशक्रोशीतील नागरिकांमध्ये ऐकू येत आहे. तर सोसायटीच्या २८ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या निवडणुकीकडे खारेपाटण दशक्रोशीतील सर्वच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अभिप्राय द्या..