You are currently viewing गावराईत वृद्धाची विहिरीत उडी टाकून आत्महत्या..

गावराईत वृद्धाची विहिरीत उडी टाकून आत्महत्या..

कुडाळ /

कुडाळ तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील  धर्माजी बाबी गावडे वय ७० यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान घडली. विहिरीच्या काठावर चप्पल आणि बॅटरी दिसून आल्याने वाडीतील रहिवाशानी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र ते कुठे आढळले नसल्याने त्यांनी विहिरीतच उडी घेतली असावी असा संशय व्यक्त करत विहिरीच्या पाण्यामध्ये शोधाशोध सुरू केली. मात्र ही विहीर सुमारे ४० फूट खोल व पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने त्यांचा बराच वेळ शोध घेण्यात आला. यावेळी पोलीस पाटील स्वप्नील वेंगुर्लेकर यांच्यासह वाडीतील सर्व ग्रामस्थ शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान त्यांचा मृतदेह विहिरीत असल्याचे लक्षात येताच दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबतची खबर पोलीस पाटील स्वप्निल वेंगुर्लेकर तसेच मयताचा भाऊ दशरथ गावडे यांनी ओरोस पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत मृतदेहाचा पंचनामा केला व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवला आहे.

मयत धर्माजी बाबी गावडे हे अविवाहित असून गेली अनेक वर्षे त्यांना मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचा उपचार सुरू होता. त्यामुळे ते आजारपणालाही कंटाळले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. एडवेंचर सिंधुदुर्ग या टीमचे ओमकार लाड वराड यांनी मृतदेह बाहेर काढण्यास मोलाचे सहकार्य केले. तर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी अमित यादव, पाडवे, वारा, पावसकर, नागरगोजे यांनी पंचनामा केला.

अभिप्राय द्या..