सावंतवाडी /-

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ताणतणावांना समोरे जात असते.अनेक आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आपल्या ताणतणावयुक्त जीवनशैलीशी असतो.सकारात्मक जीवन पद्धतीचे परिणाम आपल्या मनासह शरीरावर देखील सकारात्मकच होतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास तणावमुक्त जिवन जगुन आजारांना दूर ठेवता येते असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये यांनी केले.

प्रत्येकाच्या जीवनातील दुःख रुपी अंध:कार नष्ट होऊन, पोर्णिमेसारखा निश्चल, स्वच्छ सुखरूपी प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात यावा, या उद्देशाने सावंतवाडी येथील सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “मोटिवेशनल व्याख्यान” मध्ये पद्मजा आंबिये बोलत होत्या.

यावेळी पद्मजा आंबिये यांनी जीवनात सर्वानाच ताणतणावांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अचानक ब्लँक झाल्याप्रमाणे वाटते. तर मोठ्यांनाही अचानक संकट आल्यास काहीही सुचेनासे होते. त्यामुळे यातून शांतपणे कसा मार्ग काढावा याबाबत मानसशास्त्राच्या आधारे पद्मजा आंबिये यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संकटसमयी मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत अनेक उदाहरणांच्या माध्यमातून महत्वाच्या टिप्स दिल्या.

या व्याख्यानात पद्मजा आंबिये यांनी ताणतणावामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या विविध परिणामांचा उहापोह केला. आजकाल समाजामध्ये सर्रास आढळणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार अशा अनेक आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आपल्या ताणतणावयुक्त जीवनशैलीशी असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून ध्यानधारणा, हलके शारीरिक व्यायाम, स्वतःला आवश्यक वेळ देण्यासह समाजाभिमुखता कार्याची गरज स्पष्ट केली. तसेच यावेळी मानसशास्त्रीय ट्रिक्सच्या आधारे त्यांनी ताणतणावाच्या अनेक बाबींचा उलगडा सहज सोप्या पद्धतीने करून दाखविला.

कोजागिरी पौर्णिमेला मोटिवेशनल व्याख्यान या सकारात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने पद्मजा आंबिये यांचे डॉ. दीपा पिरणकर यांनी स्वागत केले तर आभार डॉ. मुग्धा ठाकरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page