You are currently viewing ‘माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्यूटी रद्द करा’ या मागणीसाठी शिक्षक भारतीचा आक्रमक पवित्रा..

‘माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्यूटी रद्द करा’ या मागणीसाठी शिक्षक भारतीचा आक्रमक पवित्रा..

सिंधुदुर्ग /-

शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यातील सर्व‌ माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना डुट्या जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत, पण जिल्ह्यात केवळ दोडामार्ग तालुका तहसीलदार यांच्या विचित्र धोरणामुळे त्या तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना शाळेत अध्यापन करण्याऐवजी चेकपोस्टवर ड्युटी करावी लागत आहे. या गळचेपी धोरणाविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटना आक्रमक झाली असून उद्या शुक्रवार दि. २२ रोजी दु. ३ ते ५ या वेळेत दोडामार्ग तहसीलदारांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर व तालुका अध्यक्ष शरद देसाई यांनी दिली.

तहसीलदारांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षकांना ड्युट्या लावल्याने माध्य. शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. या धोरणाविरोधात शिक्षक भारती आंदोलन करणार असल्याची माहिती संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत शासनाने 4 ऑक्टोबर, 2021 पासून माध्यमिक शाळा पाचवी ते बारावी वर्ग सुरू केले आहेत. मागील दीड वर्षाचे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढायचे आहे. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. अशा स्थितीत शिक्षकांना ड्युटीला लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या शासनाने सर्व गोष्टींवरील निर्बंध हटवले आहेत. सगळ्या गोष्टी खुल्या केल्या आहेत. असे असताना शिक्षकांना ड्युटी लावल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांनाही माहिती देऊन न्याय मागणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर तसेच कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव सुरेश चौकेकर, संघटक समीर परब, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण, तालुका अध्यक्ष शरद देसाई, जिल्हा पदाधिकारी युवराज सावंत, श्रीनिवास शिंगे, प्रेमनाथ गवस यांनी दिली.

अभिप्राय द्या..