मसुरे /-

मसुरे गावचे सुपुत्र, शिवसेना नेते तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत महादेव परब (७० वर्ष) यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत शनिवारी रात्री निधन झाले.शिवसेनेचे आक्रमक कामगार नेते,सामाजिक चळवळीतील खंबीर नेतृत्व जयवंत परब यांच्याकडे होते.जयवंत परब यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मसुरे येथील बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवसेनेच्या माध्यमातून अनेक पदे त्यांनी भूषविली होती. भारतीय कामगार सेना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

मुंबई महानगरपालिका अंधेरी भागातून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी त्यांची ओळख होती. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक युवकांना पंचतारांकित हॉटेल, विमानतळ आदी ठिकाणी नोकरीस लावले होते. परब मराठा समाजाचे ते अध्यक्ष होते. मुंबई व मसुरे येथे समर्थ सहकारी पतपेढीच्या माध्यमातून अनेक युवकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळवून दिले. गावातील मुलांना इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेता यावे यासाठी मसुरे येथे भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना त्यांनी केली . गावातील गरीब परिस्थिती असलेल्या अनेक मुलांना त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा कडवा शिवसैनिक म्हणून उल्लेख करत असत. ‘जन हो जयवंत व्हा!’ असा अग्रलेख सुद्धा सामना मधून त्याकाळी प्रसिद्ध झाला होता. अंधेरी परिसरात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. रविवारी दुपारी अंधेरी- मुंबई येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. समर्थ सह. पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश परब व शिवसेना पदाधिकारी सुनील परब यांचे ते भाऊ तर मसुरे जी. प. सदस्या सौ सरोज परब यांचे दिर होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page