You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले.;सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर ९८२ संस्था मतदार अंतिम १९५ संस्था मतदानापासून बाहेर..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले.;सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर ९८२ संस्था मतदार अंतिम १९५ संस्था मतदानापासून बाहेर..

सिंधुदुर्गनगरी /-

 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१ ते २०२६ करिता व्यवस्थापकीय समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या यादी नुसार जिल्ह्यातिल एकूण १ हजार १७७ मतदार सहकारी संस्थापैकी ९८२ संस्था मतदान करण्यास पात्र ठरल्या आहेत. तर १९५ संस्था मतदानापासून बाहेर गेल्या आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांची नेमणूक करण्यात आली असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी लवकरच निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी सोमवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातिल एकूण १ हजार १७७ मतदार सहकारी संस्था आहेत. यापैकी ९५७ मतदार प्रारूप यादीसाठी पात्र ठरले होते. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर १३ सप्टेंबर पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या आक्षेपांवर २२ रोजी निर्णय देण्यात आला आणि २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोकण विभागीय सहनिबंधक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आप्पाराव घोलकर यांनी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. कोकण विभागीय सहनिबंधक कार्याकय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधक, सहाययक निबंधक आणि सहकारी अधिकारी श्रेणी १ कार्यालय येथे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी ३ ते १३ सप्टेंबर हा कालावधी ठेवण्यात आला होता. हा आक्षेप कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी कार्यालयात नोंदवायचा होता. २२ सप्टेंबर रोजी या आक्षेपावर निर्णय देण्यात आले. जिल्ह्यातील प्रारूप यादीतून वगळलेल्या संस्थांपैकी ४९ संस्थांनी यावर आक्षेप घेतले होते.यापैकी ३५ संस्थांना मंजुरी देण्यात आली.तर १४ संस्थांचे आक्षेप नामंजूर करण्यात आले. त्यानंतर याची अंतिम यादी २७ सप्टेंबर रोजी कोकण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधक, सहाययक निबंधक आणि सहकारी अधिकारी श्रेणी १ कार्यालय येथे ही यादी प्रसिद्ध केली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत तालुका निहाय मतदार संस्था संख्या व त्यांची नावे देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांची सात मतदार संघनिहाय ही यादी आहे.  यात सहकार शेती पतपुरवठा विविध कार्यकारी-संयुक्त शेती फळबाग विकास, धान्यपेढ्या असा पहिला सभासद मतदारसंघ आहे. दुसरा मतदारसंघ नागरी सहकारी बँका, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था यांचा आहे. तिसरा मतदार संघ सहकारी पणन संस्था, शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था यांचा आहे. औद्योगिक संस्था, मजूर संस्था, जंगल कामगार संस्थळ, मोटार वाहतूक संस्था यांचा चौथा मतदारसंघ आहे. पाचवा मतदारसंघ मच्छिमार संस्था, दुग्ध संस्था, कुक्कुटपालन, वराह पालन, जनावरे पैदास करणाऱ्या संस्थाचा समावेश आहे. विणकर संस्था, घरबांधणी संस्था, देखरेख संस्था तसेच पोटनियम क्र ३० (१ अ) व ३० (१ क) मध्ये अनुक्रमे १ ते ४ मध्ये अंतर्भूत नसलेल्या इतर सर्व सहकारी संस्थाचा सहावा मतदारसंघ आहे. सातवा मतदार संघ इतर कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था व सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद यांचा आहे.

जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार देवगड तालुक्यात ८३ सभासद संस्था, दोडामार्ग तालुक्यात ४८. कणकवली तालुक्यात १६६. कुडाळ तालुक्यात २१३, मालवण तालुक्यातील ११०, सावंतवाडी तालुक्यात २१२, यातील २११ संस्थानी ठराव दिला आहे. वैभववाडी तालुक्यात ५४ तर वेंगुर्ले तालुक्यातील ९६ संस्थांचा समावेश आहे.

१९५ संस्थानी मतदानाचा हक्क गमावला

जिल्ह्यात जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीला मतदान करण्यासाठी ११७७ संस्था पात्र आहेत. यातील ९८२ संस्था अंतिम मतदार यादीत आल्या आहेत. तर १९५ संस्था यातून बाहेर पडल्या आहेत. यातील काही संस्था थकबाकी व अन्य तांत्रिक कारणाने मतदान प्रक्रियेस अपात्र ठरल्या आहेत. तर काही संस्थानी मतदान करण्याचा ठरावच दिलेला नाही. त्यामुळे १९५ संस्थानी मतदानाचा हक्क गमावला आहे. विशेष म्हणजे यात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अंस्थचाही समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा