आचरा /-
तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता. बिबट्या खडकावर बसल्याचे दृश्य तोंडावळी येथील सर्वेश पेडणेकर या युवकाने चित्रित केले आहे. अधून मधून असे दर्शन देणाऱ्या या बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थ वाट पाहत असतात. ग्रामस्थही बिबट्याला पहाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. ग्रामदैवतच वाघेश्वर असलेल्या या तोंडवळी गावात संध्याकाळी होणा-या बिबट्याच्या दर्शनाला वेगळंच महत्त्व प्राप्त झाले आहे.
मालवण तालुक्यातील तोंडवळी माळरानावर पशू पक्षी यांचा नेहमीच मुक्त संचार पहावयास मिळतो येथील वाघेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होवू लागले आहे. सुरूवातीला अधून मधून क्वचितच होणारे बिबट्याचे दर्शन गेल्या महिन्यात दिवसांपासून एक दोनदा मंदिराकडून जाणारया रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कपारीवर हमखासच होवू लागले. त्यामुळे या रस्त्यावर संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. या भागात बिबट्या असूनही माळरानावर मोकळी सोडलेल्या गुरांना किंवा पाळीव जनावरांनाही या बिबट्याने कोणतीही इजा पोहोचवली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. रोज सायंकाळी किंवा एक दिवसाआड बिबट्याचे होणारे दर्शन हा तोंडवळी ग्रामस्थांचा चर्चेचा विषय ठरला आहे.
तोंडवळी गावची ग्रामदैवत वाघेश्वर
या गावचे ग्रामदैवत वाघेश्वर असल्याने या मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात बिबट्याच्या होणा-या दर्शनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.या बाबत येथील ग्रामस्थ सांगतात या अगोदरही या जंगलात आम्हाला बिबट्या दिसून येत असे. एकंदर वाघेश्वर ग्रामदैवत असलेल्या तोंडवळी गावात संध्याकाळी आळोखे पिळोखे देत समोर गर्दीची तमा न बाळगता डोंगराच्या कड्यावर बिनधास्त येणारी बिबट्याची स्वारी मात्र या भागात चर्चेचा विषय ठरला आहे
फोटो
तोंडवळी माळरानावर वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या खडकावर बसलेला बिबट्या