वेंगुर्ले /-

नारळाच्या झाडाला नुसता कल्परुक्ष नाही तर त्याचे फायदे पहाता त्याला महाकल्पवृक्ष म्हणून संबोधले जायला हवे. या झाडाची योग्य नियोजन आणि शास्त्रोक्त पद्धतीने मशागत केल्यास नारळाच्या येणाऱ्या उत्पादनातुन येथील शेतकरी बागायतदार आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक बी. एन. सावंत यांनी केले. वेंगुर्ला येथील जागतिक नारळ दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

जागतिक नारळ दिनानिमित्त आज गुरुवार २ सप्टेंबर रोजी वेंगुर्लेतील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कार्यालयात नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. सावंत बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, यशस्वी उद्योजक उमेश येरम, डॉ. संजीव लिंगवत, सदाशिव आळवे, आर्किटेक्ट डिसोजा, कृषी भूषण संजना कदम, जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, रंजीत हेवाडे, प्रविणा खानोलकर, श्रुती रेडकर यांच्यासह मुळदे येथील विध्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना एम. के. गावडे म्हणाले की, नारळ हा खरोखरच कल्परुक्ष आहे. त्यामुळे आज या जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने किमान पाच झाडे लावण्याचा संकल्प करूया. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने नारळ बोर्ड ची माहिती जिल्ह्याला करून देणारे राजाभाऊ लिमये यांची आठवण आज केलीच पाहिजे. परंतु राज्यात नारळ बोर्ड चे ऑफिस उघडलं पण फंड नाही ही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, यशस्वी उद्योजक उमेश येरम, डॉ. संजीव लिंगवत यांनी तसेच विद्यार्थ्यांनाही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगतशील नारळ उत्पादक शेतकरी उमेश येरम, कृषी अधिकारी गुंड, बी. एन. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page