मुंबई /-
राज्यात गेल्या काही दिवसात नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यावरील विधानानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांना झालेल्या अटक व सुटकेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली. या प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दीक चकमक काही संपत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
“जनता जगली काय?, त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला १०० टक्के राजकारण करायचं आहे. समोर करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवी सोई सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीत. पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहीजे आहेत. कशाला आशीर्वाद?, जनतेचे जीव धोक्यात घालायला. या सर्व घाणरड्या राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हिताची कामं करत आहोत. तुमचं कौतुक करतो.”, अशी अप्रत्यक्षरित्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेवर केली.
“दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. करोनाचे संकट जगभर पसरले आहे .करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे..”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.