You are currently viewing पेंशनर्स संघटनेच्या लढ्याला मिळाले यश.;सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच मिळणार पेन्शन.;पेंशनर्स असो अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांची माहिती

पेंशनर्स संघटनेच्या लढ्याला मिळाले यश.;सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच मिळणार पेन्शन.;पेंशनर्स असो अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांची माहिती

कणकवली /-

१ जुलै १९७२ नंतर नोकरीला लागलेल्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आणि जि. प. सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केल्याने पेन्शनर्स असोसिएशनच्या लढ्याला अखेर यश आले, असे प्रा . महेंद्र नाटेकर म्हणाले. कणकवली तालुका पेन्शनर्स भवनमध्ये पेन्शनर्सची सभा आयोजित केली होती. त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी प्रा.’पी. बी. पाटील, व्ही. के. चव्हाण, विश्वनाथ केरकर, मोहन सावंत, अशोक राणे, अनंत कदम, अनंत घोणे, अरुण गणपत्ते, मनोहर पालयेकर, वा. ल. तेली, सिध्दार्थ तांबे, चंद्रकांत राणे इत्यादी उपस्थित होते.

प्रा. महेंद्र नाटेकर पुढे म्हणाले, ३० जून, १९७२ पर्यंत नेमणुका झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत होती. पण १ जुलै, १९७२ पासून नेमणुका झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन योजना नाकारली. महाराष्ट्र शासनाचा हा अंधेर नगरीचा कायदा होता. त्याच्या विरुध्द आमच्या अखील महाराष्ट्र पेन्शनर्स संघटनेने हायकोर्टात दावा दाखल केला. आमचे म्हणणे हायकोर्टाने मान्य करुन सबंधित शिक्षकांना पेन्शन सुरु करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र शासनाने त्याविरुध्द सुप्रीम कोटात अपील केले. ते अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळून १ जुलै, १९७२ पासून नोकरीला लागलेल्या अप्रशिक्षित प्राथ. शिक्षकांना तात्काळ थकबाकीसह पेन्शन सुरु करा, असा आदेश २ आॕगस्ट, २०२१ रोजी दिला आहे. शिक्षणाचे दान करणाऱ्या शिक्षकांचे शोषण केले तर कोर्टाने जीवदान दिले म्हणून कोर्टाचे हार्दिक आभार व अभिनंदन! सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी काही जिल्ह्यातील जि. प. पेन्शनर्सना दर महिन्याच्या २० ते ३० तारखेपर्यंत निवृत्ती वेतन मिळते. त्यामुळे पेन्शनर्सचे फार हाल होतात. यासाठी पेन्शनर्स शिखर संघटनेचे अर्थखात्याशी संपर्क साधून पुढील महिन्यापासून महिन्याच्या एक तारखेला निवृत्ती वेतन मिळेल, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले असल्याचे समजते. केंद्राप्रमाणे राज्यांना महागाई भत्ता देण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. त्यानुसार जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ चा महागाई भत्ता अद्यापी मिळाला नाही. तो सणासुदीच्या ह्या दिवसात त्वरित देण्यात यावा, अशी शासनाकडे जोरदार मागणी आहे. पेन्शनर्स कार्यालयाचा मार्ग तेथील सार्वजनिक विहिरीकडून जातो. हा मार्ग उतरता असून तेथील दगड उखडले असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक पेन्शनरांचे तथा जेष्ठ नागरिकांचे पाय मुरगळले व फॅक्चर झाले आहेत. हा मार्ग त्वरित सुव्यवस्थित करावा, म्हणून कलेक्टर तथा सिईओंनी आदेश दिले आहे. पण अद्यापी कलमठ ग्रामपंचायतीने कार्यवाही केली नाही. ती कार्यवाही त्वरित करावी, अशी विनंती करण्यात आली. पेन्शनर्स संघटनेचे सुमारे आठशे सभासद आहेत. शिवाय ह्या कार्यालयाजवळ ग्रंथालय व वाचनालय सुरु करुन एम्. पी. एस्. सी व आय. ए. एस. चे मार्गदर्शन केले जाणार आहे. ह्यामुळे वर्दळ अधिक वाढणार आहे. म्हणून ह्या कार्यालयाकडे जाणारा मार्ग त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या चर्चेत सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी प्रोसेडिंग वाचन करुन झालेल्या खर्चाला मंजूरी देण्यात आली. सहसचीव व्ही. के. चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले .

अभिप्राय द्या..