You are currently viewing कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर ‘बस सफारी’ ठरणार पर्यटनासाठी महत्वाची..

कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर ‘बस सफारी’ ठरणार पर्यटनासाठी महत्वाची..

राधानगरी अभयारण्यातील ‘बस सफारी’ चे करण्यात आले उद्घाटन..

कोल्हापूर /-

हिरव्या रंगाच्या नाना छटांनी, विविध प्रकारचे फुलझाडे, वन्यप्राणी, पक्षी यांनी नटलेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य असलेल्या कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यातील पर्यटन वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘बस सफारी’चे आज उदघाटन करण्यात आले. दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्त्वाचा जंगलपट्टा असून जागतिक वारसा स्थळ आहे. या परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून कोल्हापूर वन्यजीव विभागास 15+2 सीटर बस घेतली असून ही बस दररोज कोल्हापूर ते राधानगरी दाजीपूर पर्यटन सफारी करणार आहे. एका पर्यटकास नाममात्र रु. 300 रुपये फी मध्ये दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, बटरफ्लाय पार्क, राऊतवाडी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून जिल्हा प्रशासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना मोफत जंगल सफारी करता येणार आहे. या बसच्या आज पहिल्याच फेरीमध्ये बालकल्याण संकुलातील मुलांना राधानगरीची सफर करण्यात येणार आहे.

राधानगरी अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडे प्रजाती, ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती, ३५ प्रकारचे पक्षी, ३६ प्रकारच्या वन्यप्राणी प्रजाती इथे आढळतात. वाघ, बिबट्या, लहान हरीण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, सािळदर, उजमांजर, खवले मांजऱ, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात. या कार्यक्रमावेळी खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..