मुंबई /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. नारायण राणे यांच्या अटक नाट्यादरम्यान अनिल परब पोलिसांना सूचना देत असल्याची व्हीडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

नारायण राणे यांनी अनिल परब यांची सर्व प्रकरणे उकरून काढणार असल्याचा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील शिवसैनिकही अनिल परब यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. मुंबई उपनगरातील जोगेश्वरी परिसरात अनिल परब यांच्या समर्थनाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. “संकटाच्या छाताडावर तांडव करणान्यांनाच शिवसैनिक म्हणतात”. अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असा मजकूर या फलकांवर झळकत आहे. त्यामुळे भाजपच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि अनिल परब यांचा बचाव करण्यासाठी शिवसेनेनेही जोरदार फिल्डिंग लावायला सुरवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मारुन बसले होते. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तर आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो असं भाजप नेते सांगत होते. तसंच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते.

भाजपच्या या दाव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. त्यामुळे नारायण राणे यांच्या अटक नाट्याची सर्व सूत्रे अनिल परब यांनीच हाताळल्याचे बोलले जाते.

चंद्रकांत पाटलांचा इशारा

*केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे थेट पोलिसांशी संवाद साधत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परब यांच्याविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.आम्ही अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही ड्राफ्टिंग केलं आहे.प्रसार माध्यमे व सोशल मिडीयावर दाखवलेली क्लिप सर्व जगाने पाहिली आहे. किती कायदा हातात घेणं चाललं आहे? किती अरेरावी चालली आहे? पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललं आहे. यांच्यात सरकार चालवण्याची हिंमत नाही. ती क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. हे कशात बसतं हे विचारणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page