कातकरी आदिवासी बांधवांचे जीवन शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडेल.;डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

कातकरी आदिवासी बांधवांचे जीवन शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडेल.;डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर

पिसेकामते येथे अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित निर्धार मेळावा संपन्न..

कणकवली /- – कातकरी आदिवासी बांधवाना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी जाग्रृत करत असताना जीवन शिक्षण देण्याचे काम अखंड श्रमिक मुक्तिवेधच्या माध्यमातून चालू झालेले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. निरंतर चालणाऱ्या या प्रक्रियेतून सामाजिक परिवर्तनाची नक्कीच सुरवात होईल असे मत कणकवली उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी व्यक्त केले आहे.

अखंड श्रमिक मुक्तीवेध आयोजित जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सोमवारी पिसेकामते येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ. नितीन कटेकर बोलत होते. या प्रसंगी कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, कवयित्री कल्पना मलये आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. नितीन कटेकर म्हणाले कि, हजारो वर्षांपासूनच्या काही गोष्टी आपल्याकडे चालू आहेत, आता आपण त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत. कातकरी आदिवासी बांधवाना माणूस म्हणून समानतेची वागणूक देण्याची भावना अजूनही अन्य मानवी समूहात निर्माण झालेली नाही. स्त्री पुरुष समानतेची अत्यंत चांगली शिकवण हा समाज आपल्याला देत आहे. त्यामुळे कातकरी आदिवासी बांधवानी देखील आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी इतर समाजाला देताना स्वतःच्या काही वाईट सवयी सोडून द्याव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तहसीलदार रमेश पवार यांनी मार्गदर्शन करताना कातकरी आदिवासी बांधवांचे स्वतःच्या घरासोबतच प्रशासकीय पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सदैव पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी विशेष करून बिरसा मुंडा या कातकरी क्रांतिकारकांच्या कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला. बिरसा मुंडा यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी दिलेली लढाई जेवढी कातकरी बांधवांसाठी प्रेरणादायी आहे तेवढीच ती अन्य अन्यायग्रस्थ मानवी समूहांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी “उलगुलान” या शैक्षणिक उपक्रमाची मान्यवरांच्या हस्ते बोधी वृक्षाचे रोपण करून सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून कातकरी बांधवाना व्यसनमुक्त समाज, हक्काचं घर, शिक्षण, संविधानिक मानवी अधिकार, सामाजिक समता या पंचसूत्री आधारित प्रबोधन केले जाणार आहे. तर या प्रसंगी शिक्षण घेणारी मुले आणि व्यसनमुक्त झालेल्या कातकरी बांधवांचे सत्कारही करण्यात आले. यावेळी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी संस्थेची भूमिका मांडली, तर कल्पना मलये यांनी सर्वांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..