You are currently viewing सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळेच स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे.;परशुराम उपरकर

सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळेच स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे.;परशुराम उपरकर

कणकवली /-

जनतेचे प्रश्‍न सुटत नसल्‍याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्‍बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे अपयश आहे अशी टीका मनसेचे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी आज केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मनसेचे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्गवासीयांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्‍यांची सोडवणूक करण्याऐवजी जिल्ह्यातील सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्‍यारोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला या उक्‍तीप्रमाणे न झालेल्‍या विकासकामांचेही श्रेय सत्ताधारी-विरोधक घेत आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांना डावलून जिल्ह्यात परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती होते. तरीही हे लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत हे जिल्‍हावासीयांचे दुदैव आहे. परशुराम उपरकर म्‍हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, शासकीय रूग्‍णालयांमध्ये कंत्राटी वैद्यकिय अधिकारी जीव तोडून काम करत आहेत. मात्र त्‍यांना तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही. दुसरीकडे एनआरएचएम अंतर्गत सरकारी रूग्‍णालयात नियुक्‍त झालेले खासगी डॉक्‍टर्स रूग्‍णांची तपासणी न करताच सरकारचा निधी लाटत आहेत. काही डॉक्‍टर्स तर आपल्‍या खासगी रूग्‍णालयातील रूग्‍ण सरकारी रूग्‍णालयांमध्ये आणून त्‍यांची तपासणी करत आहेत. पण याविरोधात कुठलाही लोकप्रतिनिधी बोलत नाही. कारण या लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्‍नापेक्षा मलिदा खाण्यातच इंटरेस्ट आहे. कळणे मायनियंग प्रकल्‍पामुळे अनेक संसाराची वाताहात झाली. तरीही अप्पर जिल्‍हाधिकारी मायनिंगवाल्‍यांना सहकार्याची भूमिका घेतात. कळणे मायनिंग कायम स्वरूपी बंद व्हायला हवे. पण त्‍याबाबतही सत्ताधिकारी आणि विरोधक कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. विकासापेक्षा भ्रष्‍टाचार करण्याकडेच हे लोकप्रतिनिधी प्राधान्य देत असल्‍याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. 

अभिप्राय द्या..