अध्यक्षपदी ठाण्याचे गजानन चव्हाण,कोकणच्या सुपुत्रांची पाहिल्याच निवड..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिलचे सदस्य अॅड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ वकील अॅड. गजानन चव्हाण यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी कोकणच्या सुपुत्रंची झालेली ही निवड म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. या निवडीबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सर्वस्तरातून व कोकणवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यातील दीड लाखांहून अधिक वव्ि प्रतिनिधित्व करणाऱ्या बार कौन्सिलच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा कोकणच्या सुपुट्रांची झालेली निवड इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे.

मुंबई हायकोर्टातील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या मुख्य कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ॲड. संग्राम देसाई उभे राहिले होते. एकूण 169 उमेदवारांमधून 25 उमेदवारांची निवड करावयाची होती. यात संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून 2500 हून अधिक मते मिळवत अॅड. देसाई हे नवव्या क्रमांकाने विजयी झाले होते. विशेष म्हणजे 512 वकील संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अॅड. देसाई यांनी ही निवडणूक लढविली आणि पहिल्या पसंतीची मते मिळवत विजय संपादन केला होता. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झाल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्ह्यातील नावाजलेले वकील कै. अॅड. डी. डी. देसाई यांचे संग्राम देसाई हे सुपुत्र. श्री देसाई यांनी सिंधुदुर्गमध्ये अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये बाजू मांडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रथितयश वकील अशी त्यांची ओळख आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्यपदी निवडून आल्यानंतर अनेक गरजू,संकटग्रस्तांना कौन्सिलच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.

मुंबई येथे झालेल्या या बैठकीवेळी अॅड. अभय खांडेपारकर त्यांच्यासमवेत सिंधुदुर्गमधून अॅड. उमेश सावंत, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. अमोल सामंत, अॅड. अनिल निरवडेकर, अॅड. निखिल गावडे अॅड. स्वरूप पै, अॅड. यतिश खानोळकर, अॅड. ऋषी देसाई, अॅड. महेश शिंपुकडे, अॅड. आनंद गवंडे, अॅड. अमित सावंत, अॅड. विवेक माडगूळकर, अॅड. संजय खानोलकर, अॅड. शार्दुल पिंगुळकर, अॅड. हितेश कुडाळकर, अॅड. अविनाश परब तसेच अॅड. रवी जानकर कोल्हापूर, अॅड. गोविंद दळवी व अॅड. संदीप पाटील चंदगड हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page