चाकोरीबाहेरील शिक्षणातून ध्येय निश्चित करा.;सतीश सावंत भिरवंडे ग्रा.प.तर्फे गुणवंत्ताचा सत्कार

चाकोरीबाहेरील शिक्षणातून ध्येय निश्चित करा.;सतीश सावंत भिरवंडे ग्रा.प.तर्फे गुणवंत्ताचा सत्कार

कणकवली /-

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवत त्यादृष्टीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. चाकोरीबाहेरील अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षा यातून उच्च दर्जाच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येक मुलाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. भिरवंडे ग्रामपंचायतींच्यावतीने आयोजित दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींच्या विशेष सत्कार कार्यक्रमात सतीश सावंत बोलत होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, सेवानिवृत्त शिक्षक गणपत सावंत, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत, कृषी मंडळ अधिकारी राजन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

गावातील दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या 25 विद्यार्थ्यांचा तसेच कनेडी माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेजचा शैक्षणिक आलेख नेहमी उंचावत ठेवणार्‍या व दहावी, बारावी परीक्षेचा प्रशालेचा निकाल 100 टक्के लागल्याने मुख्याध्यापक सुमंत दळवी व पर्यवेक्षक बयाजी बुराण यांचा सत्कार करण्यात आला. भिरवंडे गावचे पूर्वाश्रमीचे तलाठी अर्जुन पंडित यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उत्कृष्ट तलाठी पुरस्कार मिळाल्याने तसेच भिरवंडे ग्रा.पं.चे ग्रामसेवक राकेश गोवळकर यांची बदली झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. भिरवंडे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याने तसेच देवालये संचालक मंडळाचे उपाध्यक्ष जयवंत सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रथमेश सावंत म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये भिरवंडे गावातून कर्तृत्ववान व्यक्तीमत्वे निर्माण झाली आहेत. गावाला मोठा राजकीय वारसा आहे. याचा विचार करत प्रत्येक विद्यार्थ्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्वल यश संपादन करत गावाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहीजे. पारंपारीक शिक्षणामध्ये न अडकता नाविन्यपूर्ण शिक्षण घेत त्यात करिअर केले पाहीजे असे सांगितले. यावेळी गणपत सावंत, मोहन सावंत, सुजाता सावंत, बयाजी बुराण, राजेंद्र सावंत, राजन सावंत, राकेश गोवळकर, अर्जुन पंडित, मिहिर सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुमंत दळवी तर आभार उपसरपंच नितीन सावंत यांनी मानले. ग्रामसेवक राकेश गोवळकर व तलाठी अर्जुन पंडित यांना भिरवंडे ग्रामस्थांच्यावतीने सन्मानपत्र देत त्यांचा गौरव करण्यात आला.

अभिप्राय द्या..