डॉ.देवधर आणि भगीरथ प्रतिष्ठान राणेंचे एजंट आहेत का?

देवगड /-

सतिश सावंत यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवून जिल्हा बँक जिंकण्याची थिल्लर स्वप्ने काहींना पडत आहेत. असल्या कंत्राटावर पोट भरण्यासाठीच मिलिंद मेस्त्रींची नेमणूक झाली आहे, असा तिखटजाळ पलटवार शिवसेनेचे ॲड.प्रसाद करंदीकर मिलिंद मेस्त्रींवर केला आहे.

भाजपासाठी रस्त्यावर रक्त सांडणाऱ्या राजन चिकेसारख्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्याचा बळी देऊन मिलिंद मेस्त्री भाजपाचे कणकवली तालुकाध्यक्ष बनले आहेत. सिंधुदुर्गात भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचे षडयंत्र चालले आहे. पक्षाचे कित्येक प्रमुख विद्यमान पदाधिकारी वैतागाने घरी बसले आहेत. पाहिजे असेल तर त्यांची यादीच देऊ. त्यांच्या नाराजीची खरी कारणे आधी शोधा. गल्लीतल्या भाजपाच्या खडानखडा भानगडी जे सतिश सावंत जाणतात ते भाजपात प्रवेश करायला दिल्लीच्या वाऱ्या कशाला करतील?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यावर अनेकांना सतिश सावंत यांना भाजपात घ्यायचे डोहाळे लागले आहेत. सतिश सावंत यांची राजकीय ताकद त्यातून समजते. त्यांच्या शिवसेनेच्या निष्ठेबद्दल संशय घेण्याच्या कंत्राटावर डोके आपटून मेस्त्रींना कसलाही फायदा होणार नाही, असा टोला ॲड. प्रसाद करंदीकर यांनी लगावला आहे.

मिलिंद मेस्त्री यांनी सतिश सावंत यांच्यावर टीका करण्यापूर्वी डॉ.प्रसाद देवधर आणि भगीरथ प्रतिष्ठानच्या कामाची खात्री करून घ्यावी. डॉ प्रसाद देवधर हे मेस्त्रींच्या म्हणण्याप्रमाणे नारायण राणेंचे भाजपा प्रवेशासाठीचे एजंट आहेत का?वभगीरथ प्रतिष्ठान नारायण राणे किंवा भाजपची इन-कमिंग सोर्स एजन्सी आहे का? हे आधी मेस्त्रींनी स्पष्ट करण्याची गरज आहे. आधी त्यांनी या संस्थेची माहिती घ्यावी, भाजप समजून घ्यावा आणि मगच पोकळ पत्रकबाजी करावी, असा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे ॲड. प्रसाद करंदीकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page