गाळ – गोटे काढल्यास नदीचे पात्र वाढण्याचा आहे धोका..
बांदा /-
इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. मरण पत्करेन पण मागे फिरणार नाही, असे आव्हान इन्सुली उपसरपंच रामचंद्र उर्फ काका चराटकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
इन्सुली गावाची भौगोलिक परिस्थिती आणि नदीचे वाढते पात्र पाहता नदीतील गाळ काढल्यास नदीपात्राजवळील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. तेरोखोल नदीवरची पाहणी केल्यास इन्सुली बिलेवाडी ते कुडवटेंब -तुळसान पुलपर्यंत नदीत गाळच नाही आहे. नदीच्या पात्रात दगड-गोटे आहेत, नदीचे पात्र पहिले १०० मीटर होते. ते आता जवळपास २०० मीटर झाले आहे. त्यामुळे नदीतील गाळ काढणार की गोटे काढणार, ते पहिले महसूल अधिकाऱ्यांनी पाहणी करूनच परवानगी द्यावी. फक्त महसूल मिळतो म्हणून आम्हा नदीपात्राजवळील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करु नये. इन्सुली गावात आलेला महापुर हा अतिपाऊस, धरणाचे सोडलेले पाणी त्याचे योग्य नियोजन नसल्याने इन्सुली-बांदा-वाफोली या गावांना फटका बसतो. पाटबंधारे विभागाने ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केले, तरच येणाऱ्या पुरामुळे नुकसान होणार नाही. तुम्ही गाळ काढा किंवा गोटे काढा, पुरामुळे नुकसान होणार, हे त्रिवार सत्य आहे. आज नदीपात्रातील गोटे-गाळ काढल्यास २०० मीटरचे नदीपात्र ३०० मीटर व्हायला वेळ लागणार नाही, असे काका चराटकर यांनी म्हटले आहे.