सिंधुदुर्ग /-

आ.वैभव नाईक यांच्या मागणीवरून ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची आज भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी केली.त्यावर ना.हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जि.प. सदस्य नागेंद्र परब यांनी पुराव्यांसहीत आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध केले. जि.प. शाळांना जे वॉटर फिल्टर-कुलर पुरविण्यात आले त्यांची प्रत्यक्ष बाजारामध्ये १५ हजार किंमत असताना प्रत्यक्ष २० हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्याची बाब कागद पत्रांसाहित जि.प. सदस्य नागेंद्र परब यांनी सादर केली. काही शाळांना कोरी बिले देखील देण्यात आली आहेत. यामुळे १००५ शाळांना वॉटर फिल्टर-कुलर पुरविताना किमान ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला गेला असल्याचे निष्पन्न होते. तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून केलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये झालेल्या ५० लाख रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचाराची आपले स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच यामधील दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मा. आयुक्त, कोंकण विभाग यांना देण्यात यावेत अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी पत्राद्वारे ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. याची दखल घेऊन ना.हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तात्काळ सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page