You are currently viewing भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल..

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल..

मुंबई /-

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी चारित्र्यहननाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरूर कासार येथे खून झालेल्या एका सुवर्णकाराच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी चित्रा वाघ या १८ जुलै २०२१ रोजी आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकार बलात्काऱ्यांना आश्रय नव्हे तर राजाश्रय देत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख केला होता. वाघ यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर मेहबूब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचे आरोप केले. त्याचा व्हिडिओ मेहबूब शेख यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी सोमवारी शिरूर पोलिसात तक्रार दिली होती.

सदर तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे की, वाघ या शिरूर येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे होते.या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसमोर बोलताना वाघ यांनी आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप केले.शिरूर येथील जि.प.सदस्य शिवाजी पवार यांच्या निवासस्थानी बोलताना शिरूर येथील राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका मुलीवर बलात्कार केला व त्यास पोलिस अटक करत नसल्याचे म्हणत माझी बदनामी केली.चित्रा वाघ या बोलत असलेली व्हिडिओ क्लिप पत्रकार भरत पानसंबळ व गोकुळ पवार यांनी मला दाखवली. माझ्या मित्राकडून व कार्यकर्त्यांकडून याची विचारणा झाल्याने मला मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली. तो गुन्हा पोलिसांनी तपास करून निकाली काढला आहे. असे असताना चित्रा किशोर वाघ यांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने हे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा