मालवण /-
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून पारंपरिक मच्छीमारांना देशोधडीला लावले गेले अशा प्रकारची जाहीर वक्तव्ये पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्यांकडूनच केली जात असल्याने यापुढे आपण पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेणार नाही. मात्र आपण स्वतः अधूनमधून मासेमारीस जात असल्याने स्वतःचा रोजगार वाचविण्यासाठी शासनदरबारी वैयक्तिकरित्या सनदशीर मार्गाने प्रश्न मांडतच राहणार, अशी भुमिका महेंद्र पराडकर यांनी जाहीर केली आहे.
श्री. पराडकर म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी चमकोगिरी करण्याची हौस आपणास नाही. माझी जेवढी बौध्दिक, शारीरिक आणि आर्थिक कुवत आहे त्यानुसार मी आजवर पारंपरिक मच्छीमारांसाठी सक्रीयपणे कार्यरत राहिलो. माझ्या विचारधारेनुसार पारंपरिक मच्छीमार लढ्यात काम करण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असताना स्वतःचे नाव प्रसारमाध्यमांमधून झळकत राहणार या उद्देशाने कधी पत्रकबाजी केली नाही. लोकसभा निवडणुकीवर पारंपरिक मच्छीमारांनी बहिष्कार घालावा यासाठी आग्रही असणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांमध्ये मीदेखील होतो आणि अखेरपर्यंत निर्णयावर ठाम राहिलो. परंतु लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले गेले, असा आरोप आमच्यावर होतो आहे. आपण पारंपरिक मच्छीमारांसाठी करतोय तेच योग्य आणि ईतर काहीजण करतात ते चुकीचे अशी काहींचे मत आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ते जाहीररित्या करीत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या आमच्यासारख्यांनी सक्रीय लढ्यातून थांबलेलेच बरे. परंतु आपण स्वतः अधूनमधून मासेमारीस जात असल्याने आणि पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेले मासे सोडविण्याची कामं करीत असल्याने माझा रोजगार टिकावा म्हणून वैयक्तिकरित्या शासनदरबारी प्रश्न मांडतच राहणार. मच्छीमारांच्या जाहीर सभा, आंदोलने, बैठका आणि त्यामधील भाषणबाजी यापासून दूर राहणार. कारण पारंपरिक मच्छीमारांसाठी सक्रीयपणे कार्यरत असताना माझी जी एक विचारधारा आहे ती काहींना मान्य नाही. एकप्रकारे ती विचारधाराच पारंपरिक मच्छीमारांना मारक आहे असे जाहीरपणे बोलले गेले आहे. त्यामुळे सक्रीय पारंपरिक लढ्यापासून दूर राहू असे सांगितले.