नांदगाव येथे ग्रामविकास समितीच्या सदस्यांना महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण..

नांदगाव येथे ग्रामविकास समितीच्या सदस्यांना महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण..

कणकवली /-

ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०% महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच समितीतील सदस्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे हे प्रशिक्षण पार पडले.

यावेळी महिला राजसत्ता आंदोलनच्या कोकण समन्वयक हर्षदा वाळके उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, लोकशाही प्रक्रियेद्वारे व्यापक आधार व सर्वांचा सहभाग असलेली आणि थेट सामुहिक निर्णय प्रक्रिया बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचना करणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ५०% महिलांची भागीदारी बंधनकारक आहे. काही समित्यांना शासनाच्या योजनेतून दरवर्षी निधी प्राप्त होतो. त्याच्या वापराची दिशा व धोरण या समितीने ठरवायचे असते. समितीतील सदस्यांचा सक्रीय सहभाग ग्रामविकास प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत हर्षदा वाळके यांनी व्यक्त केले आहे.

सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी समिती सदस्यांचे प्रशिक्षण घेण्याची गरज असते. त्यामुळे विकेंद्रित पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणासाठी व समित्या सक्रिय होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज ओळखून महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने ग्रामदृष्टी प्रकल्पांतर्गत विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासाठी ग्रामपंचायत नांदगाव येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे हर्षदा वाळके यांनी सांगितले.

या प्रशिक्षणास महिला राजसत्ता आंदोलनाच्या कोकण विभाग समन्वयक हर्षदा वाळके व कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, आयनल सरपंच बापू फाटक, नांदगाव उपसरपंच निरज मोरये, असलदे उपसरपंच संतोष परब, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी श्री. हरमलकर, कोळोशी ग्रामसेवक श्री. राणे, भाई मोरजकर, पंचायत सखी अनामिका गगनग्रास, प्रणाली मेस्त्री, शिल्पा इंगळे, सानिका तांबे उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थींनी चर्चेत सहभाग घेतला. सर्वांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता झाली.

अभिप्राय द्या..