राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ,रत्नागिरी,सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस..

राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ,रत्नागिरी,सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस..

रत्नागिरी :/-

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोकणात पुन्हा एकदा धुवाँधार कोसळायला सुरुवात केली आहे. कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. जर रात्री जोरदार पाऊस पडला तर सकाळपासून काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही भागातील शेती पाण्याखाली गेली आहे.

*रत्नागिरीतील वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ..

रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.चिपळूण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे रात्री वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र पहाटे पावसाचा जोर कमी झाल्याने पाणापातळीत घट झाली आहे. मात्र गेल्या काही तासांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील तळी वडनका या परिसरात रस्त्यावर पाणी साचलं होतं. तसेच जर अशाचप्रकारे मुसळधार पाऊस पडत राहिला तर चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

*बाजारपेठेला पुराचा धोका

रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. या मुळे माखजन बाजारपेठेत पाणी शिरले आहे. माखजन बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांची दुकानं रात्रभर पाण्याखाली आहेत. संगमेश्वर भागात पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे माखजन बाजारपेठेला पुराचा धोका वाढला आहे.

राजापुरात अर्जुना आणि गोदावरी नदीला पूर..

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर राजापूर तालुक्यात अर्जुना आणि गोदावरी नदीला पूर आला आहे.त्याशिवाय राजापूर बाजारपेठेत दोन- तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. गेल्या दहा तासांपासून राजापूरला पुराने वेढा दिला आहे. राजपूर बजाारपठेतील शिवाजी पुतळ्यापर्यंत पाणी साचले आहे. राजापूर नगर परिषद अलर्टवर पाहायला मिळत आहे.राजापूर शहरातील जवाहर चौकात पाणी साचले आहे. राजापुरातील जवाहर चौकात तीन फूट पाणी साचले आहे. राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेतील नागरिकांना इशारा दिला आहे. राजापुरातील अर्जून नदीचे पाणी बाजारपेठेत सामानाची हलवाहलव करण्यास व्यापाऱ्यांची सुरुवात केली आहे.

*मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी

रायगडमधील मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. रायगडमधील मुरुड आगरदांडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तसेच कुंडलिका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे मुरुड बाजारपेठेतील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर, विद्युत पुरवठा खंडित

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच गेल्या तासांपासून सिंधुदुर्गात जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. सिंधुदुर्गातील नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

सिंधुदुर्गात संततधार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्गात काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटणमधील शुक नदीला पूर आला असून पुराचे पाणी गावात शिरले आहे.अनेक रस्तेही बंद झाले आहेत. देवगड तालुक्यातील दहिबावमधील अन्नपूर्णा नदीला पूर आला आहे. या नदीवरील पुलावर पाणी आल्याने आचरा आणि मालवणकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिकांनी रस्त्यावर तुटलेली झाडे टाकून रस्ता बंद केला आहे.

अभिप्राय द्या..