इराक : कोविड रुग्णालयात आगीचा भडका; ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू, ६७ जण जखमी

इराक : कोविड रुग्णालयात आगीचा भडका; ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू, ६७ जण जखमी

रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन भयंकर दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर रुग्णालयातील कोविड वार्डामध्ये भीषण आग लागली. या अग्नितांडवात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह तब्बल ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर याा दुर्घटनेत ६७ जण जखमी झाले आहेत. नसीरिया या इराकच्या दक्षिणेकडील शहरात ही घटना घडली.

करोनाच्या उद्रेकानंतर नसीरियात अल हुसैन कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं. या रुग्णालयातच भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ रुग्णांना प्राण गमवावा लागला. या घटनेत ६७ लोक जखमी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊनच आग लागल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं.
 आग लागल्यानंतर रुग्णालयात धावपळ उडाली. स्फोटामुळे आग लागलेली असताना क्षणाधार्थ आगीच्या लोळांनी कोविड वार्डाला वेढा दिला. (Photo : REUTERS/Essam al-Sudani)
आग लागल्यानंतर रुग्णालयात धावपळ उडाली. स्फोटामुळे आग लागलेली असताना क्षणाधार्थ आगीच्या लोळांनी कोविड वार्डाला वेढा दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जळणारे मृतदेह बाहेर काढावे लागले. तर आगीमुळे सगळीकडे धूर पसरल्यानं अनेक कोविड रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला. दरम्यान या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पंतप्रधान कदीमी यांनी दिले आहेत. (Photo : REUTERS/Essam al-Sudani)
या घटनेची पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी गंभीर दखल घेतली. पंतप्रधानांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पंतप्रधान कदीमी यांनी या बैठकीत दिले. यापूर्वीही एप्रिलमध्ये बगदादमधील एका रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत ८२ रुग्ण होरपळून मरण पावले होते. तर ११० जण जखमी झाले होते. इराकमधील आरोग्य विभाग मोठ्या कठीण काळातून जात असतानाच आगीची ही दुसरी मोठी घटना घडली आहे.

अभिप्राय द्या..