वैभववाडी /-
मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील दरीकडील बाजूने मोरी खचल्यामुळे रस्ता अधिकच खचत असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज सकाळपासून करूळ घाटातून सुरू असलेली एकेरी वाहतूक सायंकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण बंद करण्यात आल्याची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. करूळ घाटातील मोरी खचून रस्ताही खचला होता. सोमवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती.मात्र घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता अधिकच खचला आहे. त्यामुळे करूळ घाटातील वाहतूक पूर्ण थांबविण्यात आली आहे. नॅशनल हायवेकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नॅशनल हायवे अभियंता गणेश कुमावत यांच्याशी एपीआय अतुल जाधव यांनी संपर्क साधल्यानंतर कुमावत दुपारी 3 वाजता घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घाटरस्त्याची अत्यंत धोकादायक स्थिती लक्षात घेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी करूळ घाटरस्त्यातील वाहतूक 26 जुलै पर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान एपीआय अतुल जाधव परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह सकाळपासून घटनास्थळी आहेत.