वैभववाडी /-
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीन महाविद्यालय ग्रंथालयांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.डॉ.एन व्ही गवळी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस. एन. पाटील म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज हे शतकोत्तर दूरदृष्टी असणारा महान राजा होता. सध्या सुरु असलेली कोरोनाची महामारी व आरक्षण यासाठी शासन आणि समाजही हतबल झाला आहे. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राजसत्तेच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवून जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले होते. तसेच सरकार दरबारी व अन्य उच्च पदावर नोकरी ही केवळ उच्च जातीतील लोकांची मक्तेदारी होऊ नये यासाठी अस्पृश्य व बहुजन वर्गाला नोकरीमध्ये ५०% आरक्षण देऊ केले. याच बरोबर सामाजिक समता शिक्षण, कला,साहित्य, क्रीडा, व्यापार शेती अशा सर्वच क्षेत्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचाराने व दूरदृष्टी ठेवून विकास केला. त्यांचे विचार आजच्या राज्यकर्त्यांना व समाजाला प्रेरणादायी आहेत.
प्रा.आर. एम. गुलदे म्हणाले छत्रपती शाहू महाराज हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण विषयक विचारांनी प्रेरित झाले होते. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. एन व्ही गवळी यांनी छत्रपती शाहू महाराजांनी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेला छेद देण्याचे काम केले. तसेच ते कला, क्रीडा, साहित्य प्रेमी होते. त्यामुळे कलेचे आश्रयदाते होते. त्यांनी व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी सुद्धा मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए.एम. कांबळे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. आर. ए. भोसले यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार डॉ.व्ही ए पैठणे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतीक विभाग प्रमुख सहा. प्रा. एम. आय. कुंभार यांनी केले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज जयंतीचे ऑनलाइन पद्धतीने सुद्धा आयोजन केले आहे तो कार्यक्रम महाविद्यालयाच्या यूट्यूब चैनलवर अपलोड करण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सांस्कृतीक विभाग प्रमुख एम. आय. कुंभार यांनी केले आहे.