पंचायत समिती कुडाळ आयोजित आंब्रड येथे महाआवास..ई गृहप्रवेश

पंचायत समिती कुडाळ आयोजित आंब्रड येथे महाआवास..ई गृहप्रवेश

कुडाळ /-

आंब्रड ग्रामपंचायतीने ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी प्रसंगी केलेले कार्य कौतुकास्पद असून कुडाळ पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास आणि रमाई आवास मध्ये कोकण विभागात आणि राज्य स्तरावर सुद्धा अतिशय उल्लेखनीय कामागिरी केली असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले . लाभार्थी, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी संघटितरीत्या एकदिलाने कार्य केल्यास ग्राम विकास दूर नसल्याचे ते म्हणाले.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी , ” महा आवास अभियान – ग्रामीण ई गृहप्रवेश ” कार्यक्रमाप्रसंगी आंब्रड ग्रामपंचायत येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
पंचायत समिती कुडाळ आयोजित हा कार्यक्रम आंब्रड येथे संपन्न झाला. आंब्रड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आंब्रड मध्ये एकूण 70 घरकुले तर रमाई आवास योजनेत 18 घरकुले बांधनेत आली असून अभियान कालावधीत ५० लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली होती पैकी ४८ घरे पूर्ण करून आंब्रड ग्रामपंचायतीने जिल्ह्यात आदर्शवत कार्य केल्याने हा तालुकास्तरीय कार्यक्रम आंब्रड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकाच दिवशी 30 लाभार्थी नी गृहप्रवेश केला.
कुडाळ पंचायत समिती मार्फत कुडाळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेत 1089 घरकुले मंजूर करणेत आली असून आतापर्यंत 951 घरकुले बांधून लाभार्थी राहण्यास गेले आहेत. तर रमाई आवास योजनेत 462 घरकुले मंजूर करणेत आली त्यापैकी 417 घरे पूर्ण झाली असून लाभार्थी राहायला गेले आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या महाआवास अभियान कालावधीत 285 एवढी विक्रमी घरे बांधून पूर्ण करणेत आली आहेत. कुडाळ पंचायत समितीची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर,उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण ,डी.आर.डी.ए. प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर ,सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी धामापुरकर, प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी सानिका चव्हाण ,स्नेहा नागदे , विलास गोसावी ,सरपंच विठ्ठल तेली,उपसरपंच विजय परब, ग्रामसेविका कांचन कदम व लाभार्थी उपस्थित होते .
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरपंच विठ्ठल तेली यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले .जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर ,सभापती नूतन आईर, यांनीही आपले मनोगत पर शुभेच्छा व्यक्त केल्या .
प्रातिनिधिक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चावी देऊन व पाच लाभार्थ्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन फित कापून व श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी महाआवास अभियान मध्ये गवंडी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पाच लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच संदीप परब यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेविका कांचन कदम यांनी केले. लाभार्थ्यांच्या वतीने काशीराम पाडावे, पोखरण येथील राजश्री कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती कुडाळ आंब्रड सरपंच व त्यांच्या प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले म्हणूनच आज हक्काचे घर मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले .

अभिप्राय द्या..