वेंगुर्ला /-
महाराष्ट्र शासनाची ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम वेंगुर्ले तालुक्यात यशस्वीपणे राबवून त्या मोहिमेचा लाभ प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येक माणसाला मिळावा यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य विभाग,सरपंच,ग्रामसेवक यांची मार्गदर्शन बैठक आज व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी संबंधितांना या मोहिमेचा विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी वेंगुर्ले सभापती सौ अनुश्री कांबळी यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. महाराष्ट्र कोविडमुक्त करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याच्या उद्देशाने ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, गंभीर आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिशः प्रि-कोविड, कोविड आणि पोस्ट-कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कोविड नियंत्रण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. या मोहीमेसाठी आरोग्यपथके नेमण्यात येत आहेत आणि प्रत्येक पथक दररोज ५० घरांना भेट देणार आहेत. घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून एखाद्या व्यक्तीमध्ये ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे अशी कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्याची फिवर क्लिनिकमध्ये कोरोना चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ५ ते १० पथकांमागे १ डॉक्टर सेवा देणार आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत,लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे,त्यादृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर टेम्परेचर गन आँक्सिमिटर आदी वस्तू आवश्यक त्या प्रमाणात संबधित प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तरी राज्य शासनाच्या या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे असे आवाहन केले.
यावेळी गटविकास अधिकारी यांनी शासनाच्या मोहिमे विषयी मार्गदर्शन करताना या मोहिमेचा उद्देश,व्याप्ती,कार्य याबाबत माहिती दिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितिन शिरोडकर,उपसभापती सिद्धेश परब,माजी सभापती यशवंत परब,तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक,आरोग्य विभागाने अधिकारी,विविध खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते.