कुडाळ /-
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नारी शक्ती ला सन्मान देत भारत देशाची नारी शक्ती सर्व बाजूंनी बळकट करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या योजना राबविल्या यापैकीच एक योजना असलेले बचतगटांसाठी चे उमेद अभियान देशातील सर्व सामान्य महिला सबल व्हावी,आत्मनिर्भर व्हावी,उद्योजिका व्हावी हे उद्दीष्ट समोर ठेवून उमेद अभियान सुरु करण्यात आले.
केंद्र शासनामार्फत या अभियानाला मुबलक निधी पुरविण्यात येतो आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करायची आहे. पण याच उमेद अभियानात महिला बचत गटांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी वर्गाच्या नोकरीवर राज्य सरकारने गदा आणलेली आहे राज्यातील सुमारे ३ ते ४ हजार कंत्राटी कर्मचारी वर्गाला पुनर्नियुक्ती देण्यात येणार नसल्याचे समजते, यामुळे उमेद अभियानाचे पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रातील बचत गटातील महिलांचं फार मोठं आर्थिक,औद्योगिक नुकसान होणार असून मानसिक खच्चीकरण होणार आहे.त्याच प्रमाणे या कर्मचाऱ्यांवर जो विविध प्रकारच्या ट्रेनिंग साठी आजपावेतो केलेला खर्चही वाया जाणार आहे आणि ज्या बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी हि प्रशिक्षणे देण्याचे नियोजन करण्यात आले त्या महिला या मार्गदर्शनापासून वंचितच रहाणार आहेत.
आत्ता खरी गरज आहे ती या मार्गदर्शकांची ग्रामसंघ, प्रभागसंघ या सर्वांना, त्यामुळे हा जो कंत्राटी कर्मचारी यांना कमी करायचा आदेश देण्यात आला आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा ही मागणी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाकडे करीत आहोत.केंद्र सरकार देशातील प्रत्येक महिलेला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्र सरकार मात्र हेच अभियान आणि हा प्रयत्न समूळ संपविण्याच्या प्रयत्नात आहे.आता या कोरोनाच्या काळात अश्या अचानक नोकर्या गमवाव्या लागल्या तर यांची कुटुंब रस्त्यावर येतील.भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा या सर्व कंत्राटी कर्मचारी वर्गाला पुनर्नियुक्त करण्याची मागणी करत आहे.
तसेच उमेद अभियान राबविण्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करणार्या कामगारांना कामावरुन कमी केल्यास उमेद अभियानातील सर्व महिलांच्या पाठीशी भाजपा महिला मोर्चा खंबीर पणे उभी राहून न्याय मिळवून देणार असल्याचा निर्धार भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी जाहीर केला आहे.