आचरे गावच्या सीमा झाल्या बंद

आचरे गावच्या सीमा झाल्या बंद

संचारबंदी मुळे बाजरपेठेसह संपूर्ण गावात शुकशुकाट..

आचरा /-


वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ग्रामसनियंत्रण समितीने जाहिर केलेल्या सात दिवसांच्या बंदला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत घरातच रहाणे पसंत केले होते. समिती सदस्य व ग्रामस्थांनी गावात येणाऱ्या सीमेवर कडक पहारा ठेवल्याने रस्त्यावर व गावात शुकशुकाट पसरला होता.
कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी आचरा गावाने कंबर कसली असून पहिल्या दिवशी संचारबंदीची अमलबजावणी कडक झाली होती. व्यापारींनी या बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. स्थानिक ग्रामस्थ व सनियंत्रण समिती सदस्यांनी आचरे गावात येणाऱ्या देवगड,कणकवली, मालवण, हिर्लेवाडी या सीमांवर कडक पहारा ठेवला होता. याभागातून चौकशी करून गावाबाहेर जाणाऱ्या व्यक्तींनाच सोडले जात होते. गाव कोरोना मुक्ततेसाठी देवगड सीमेवर पारवाडी ग्रामस्थ, कणकवली, मालवण सीमेवर वरचीवाडी ग्रामस्थ तर हिर्लेवाडी येथील सीमेवर हिर्लेवाडी ग्रामस्थ होमगार्ड च्या सोबतीने दिवसभर पावसातही कडक पहारयासाठी झटत होते.तर आचरा तिठा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. आचरा सरपंच प्रणया टेमकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, माजी सरपंच राजन गांवकर, यांच्या सह समिती सदस्य संचारबंदी अमलबजावणीसाठी पहाणी करून लक्ष ठेवून होते. मेडिकल दुकाने अर्ध शटर बंद ठेवून आवश्यक त्यांनाच औषधे देत होते. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद होती. शेतीचा कालावधी असूनही क्रूषी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभागी झाले होते.

फोटो–आचरा तिठा येथे तपासणी करताना पोलीस कर्मचारी

अभिप्राय द्या..