मालवण /-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ग्रामविलगिकरणाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था तालुक्यातील ग्रामपंचायतींना सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती नीलक्रांती संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधीत रुग्णांना गृह विलगीकरणा ऐवजी ग्रामविलगिकरण करण्याचे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतींना दिले आहेत व त्याप्रमाणे नियोजन सुरू आहे. अशा प्रकारची सुविधा देत असताना वैद्यकीय मार्गदर्शन, प्रशिक्षित मनुष्यबळ, वैद्यकीय साधन सामुग्री, आवश्यक औषधे, वेगवान संदेश वहन यंत्रणा, मूलभूत सोयी सुविधा, वाहन व्यवस्था अशा अनेक गोष्टींची आवश्यकता भासणार आहे.
नीलक्रांती संस्था गेली वर्षभर शासनमान्य समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र, कांदळगाव तसेच कोव्हिड केअर सेंटर, कोळंबच्या माध्यमातून शेकडो कोरोना बाधीत रुग्णांना सेवा दिली आहे. तरी या सेवेच्या अनुभवाचा फायदा मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना करून द्यावा या दृष्टिकोनातून विविध ग्रामपंचायतीशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने परवानगी दिल्यास तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी संपर्क साधल्यास कोरोना मुक्तीचा मालवण पॅटर्न होऊ शकेल याची आशा आहे. तरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी
नीलक्रांती संस्था९४२२६३३५१८,९२२५९००३०३ येथे संपर्क साधावा असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले आहे.