You are currently viewing ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल !

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग -अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे; मात्र मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या ‘सस्टेनॅब्लिटी स्पिरिच्युलीटी सिप्म्लिसिटी : द 3 एस् इंटरनॅशनल कॉन्फरन्स (इस्कॉन) या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘अध्यात्माच्या आधारे हवामानातील पालट सीमित ठेवणे’, हा शोधनिबंध सादर केला. ‘इस्कॉन रिसर्च विंग (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड स्पिरिच्युलीटी (ISS))’ हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. वरील शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेला 70 वा शोधनिबंध होता. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 54 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 4 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की, कोणत्याही घटनेच्या मूलभूत कारणमीमांसेचा अभ्यास करतांना त्याचा आध्यात्मिक स्तरावरही अभ्यास होणे आवश्यक असते. जेव्हा हवामानात स्वाभाविक अपेक्षेच्या विपरित विवित्र पालट होतांना आढळतात, तेव्हा त्याच्या मागे निश्‍चितपणे आध्यात्मिक कारण असते. पृथ्वीवरील सात्त्विकता कमी झाली आणि तामसिकता वाढली की, मानवाची अधोगती होऊन पृथ्वीतलावरील साधना करणार्‍यांची एकूण संख्या कमी होते. मानवातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढून त्याचे पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. थोडक्यात, अधर्मात वाढ होते. सूक्ष्मातील शक्तीमान अनिष्ट शक्ती पर्यावरणातील या र्‍हासाचा अपलाभ घेऊन तमोगुण वाढवतात, तसेच मानवावर प्रतिकूल परिणाम करतात. ज्याप्रमाणे धूळ आणि धूर यांनी स्थूल स्तरावर प्रदूषण होते आणि म्हणून आपण प्रतिदिन स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे अधर्माचरणामुळे होणारी रज-तमातील वाढ हे सूक्ष्म स्तरावरील प्रदूषण होय. निसर्ग वातावरणातील या सूक्ष्म रज-तमाची स्वच्छता नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून करतो. या प्रक्रियेची सविस्तर माहिती ‘चरक संहिते’मध्ये दिली आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जगभरातील 32 देशांतील अनुमाने 1000 मातीच्या नमुन्यांतील सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास केला. हा अभ्यास आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परिक्षण या माध्यमांतून केला आहे. या अभ्यासात 80 टक्के नमुन्यांमध्ये त्रासदायक स्पंदने असल्याचे दिसून आले. यातील मातीचे काही नमुने आम्ही त्याच जागेतून 2018 आणि 2019 मध्ये मिळवले होते. वैज्ञानिक उपकरणाने केलेल्या चाचणीत केवळ एक वर्षाच्या कालावधीत या नमुन्यांमधील नकारात्मक ऊर्जेमध्ये 100 ते 500 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले. सारांशाने सांगायचे झाल्यास जगभरात (काही धार्मिक स्थानांतही) नकारात्मकतेमध्ये पुष्कळ वाढ झाल्याचे आढळले. शेवटी ‘हवानामातील या हानीकारक पालटाबद्दल काय करू शकतो ?’ याबद्दल सांगताना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याने हवामानातील सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठीची उपाययोजनाही मूलतः आध्यात्मिक स्तरावर असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाज योग्य साधना करू लागला, तर हवामानातील हानीकारक पालट आणि तिसरे महायुद्ध यांमुळे येऊ घातलेल्या भीषण संकटाचा सामना करता येईल. असे असले तरी प्रत्यक्षात आपण केवळ स्वतःलाच मदत करू शकतो. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे साधनेला आरंभ करणे किंवा सुरू असल्यास ती वाढवत नेणे. कालमहिम्यानुसार सध्याच्या काळासाठी नामजप हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. सध्याच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात उपयुक्त नामजप आहे, असे संतांनी सांगितल्याचे श्री. शॉन क्लार्क म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा