वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील

वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील

वेंगुर्ला /-


तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे लेखी निवेदनाव्दारे लक्ष वेधले असता पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांना संपर्क साधून तातडीने शेती-बागायतीचे पंचनामे करण्याचे आदेश जारी केले.वेंगुर्ले तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश कृषी विभागात देणेबाबतची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल व प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांनी वेंगुर्लेतील दौऱ्याच्या वेळी केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत,प्रांतिक सदस्य एम.के.गावंडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, व्हिक्टर डॉन्टस, भास्कर परब, जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अँन्थोनी डिसोझा, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सुनिल भोगटे, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, माजी तालुका उपाध्यक्ष बावतीस डिसोझा यासहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार व पणनमंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात, ‘तौक्ते’ ते या चक्रीवादळामुळे वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील शेतकरी बागायतदार यांचा
जीवनचरीतार्थ असलेल्या आंबा, काजू, नारळ, फणस, कोकम,केळी यासह फळ उत्पन्न देणारी झाडे मोठ्या प्रमाणात मोडून तसेच मुळासकट उन्मळून पडून नुकसान झालेले आहे. आंबाबागात फळ काढणीस आलेला आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात वाऱ्याने झडून नुकसान झालेले आहे. महसूल विभागामार्फत फक्त घरांचे झालेले नुकसान व त्याचे पंचनामे केले जात आहेत.पण झाडाबाबत पंचनामा करण्यासंदर्भात विचारले असता झाडांचे पंचनामे हे कृषी विभागामार्फत करण्यात येणार असून कृषी विभागाची संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या भागातील बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करण्याचे आदेश आपण द्यावेत. तसेच पंचनाम्याअंती शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबतची कार्यवाही तातडीने करावी अशी आमची वेंगुर्ले राष्ट्रवादीतर्फे मागणी आहे.

अभिप्राय द्या..