मानवता विकास परिषद मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची मागणी

मसुरे /-

अवघे विश्व कोरोना महामारीच्या अरीष्ठाने बेजार झाले असतानाच भारत देशाची अवस्था दे माय घरणी ठाय अशीच झाली आहे..! यासाठीच्या निर्णायक बचावाचा ठोस उपाय म्हणून केंद्रसरकारने संपूर्ण देशवासियांच्या लसीकरणाची व्यवस्था अगदी अगत्याने आणि तत्परतेने पूर्णतः मोफत करावी अशी आग्रही मागणी मानवता विकास परिषद मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी केली आहे.
श्रीकांत विठ्ठल सावंत हे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे शिष्य असून मानवता विकास परिषदेच्या माध्यमातून कोरोना काळातही ते विविध विधायक उपक्रमांतून कोरोना लढ्यात आमुलाग्र जबाबदारी निभावत आहेत. या कोरोना महामारीच्या आक्रीतात माणसांचे जीव जाताहेत. जळणारी प्रेतं एकटीच खिंकाळत अनंतात विलीन होताहेत. फार दूरवर गगनभेदी आक्रोशात हिरव्या बांगड्यांच्या चिंधड्या चिंधड्या करीत,तांदळासारख्या मुलांच्या सुखस्वप्नांची राखरांगोळी करीत आणि कोट्यवधी कुटुंबांच्या भवितव्याचीच रखरखीत होळी पेटवित.. ! या अशा चहुबाजूनी चक्रव्यूहात सापडलेल्या भारत देशाला आजच्या घडीला केवळ आणि केवळ सर्वच आघाडय़ांवर आविष्कृत होणारी निर्मळ, नितळ आणि निर्भेळ मानवताच वाचवू शकते, असेही उद्बोधक प्रतिपादन श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुढील तीन वर्षे निवडणुका नको!

भारत देशात आजच्या मितीला कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. अशा स्थितीत पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांची,आयपीएल स्पर्धांची, कुंभमेळ्याची आणि अनावश्यक अनेक उपक्रमांची देशाला मुळीच गरज नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या मगरमिठ्ठीतून देशाला सुटका मिळवायचीच असेल तर येत्या तीन वर्षांत कोणतीही खेळांची मोठी स्पर्धा, भरगच्च गर्दीचा धार्मिक कार्यक्रम आणि कोणत्याही स्वरुपाची सार्वत्रिक निवडणुक प्रकर्षाने टाळायलाच हवी. अशी मानवता विकास परिषदेची महामहिम राष्ट्रपती यांच्या कडे सविनय मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार व इतर जबाबदार प्रतिनिधी यांनी सर्वाना मोफत लस उपलब्ध व्हावी यासाठी नियोजनात्मक कार्य करावे असे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page