कणकवली/-


आतापासूनच सुरु झालेल्या भीषण पाणी टंचाई मुळे उन्हाळी शेती करणारया शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे ओहोळ बूजून गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नसून याकडे राजकिय नेत्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा मतदानावर बहिश्कार घालण्यात येईल, अशी भुमिका येथील तरुण शेतकर्यान्नी घेतली आहे.

सध्या कोरोना असल्याने कोरोना महामारीसमोर इतर सर्व समस्या संपल्या असेच काहिसे चित्र दिसून येते. मात्र, कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे शेतकरी मात्र पाण्यासाठी दाहिदीशा वणवण करत आहेत. निसर्गाचं वरदान असलेला हा गाव यावर्षी भीषण पाणीटंचाईशी सामना करीत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या गावच्या ओहोळात वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे आज ओहोळ बूजून गेला. गेली कित्येक वर्षे राजाश्रयाखाली चाललेल्या या उद्योगांमुळे आज गावात शेतीसह पिण्यासाठी ही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

      या गावचे भूमीपूत्र असलेले माजी आमदार शिक्षणसम्राट आणि शेतकरी पुत्र कै. केशवराव राणे यांनी शेतीसाठी फोंडाघाट व लोरेच्या सीमेवर तलाव मंजूर केला. लोरे वाघेरी गावातील सुमारे शंभर हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. आज तर हा तलाव फोंडाघाट गावासाठी जीवनदायिनी बनला. पण तलावात शेकडो ट्रक गाळ साठून यातील पाण्याची पातळी खालावली. गेली पाच सहा वर्ष या तलावातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नाही. मात्र ठेकेदारांच्या फायद्यासाठी सुमारे दहा किलोमीटर पाइपलाइनचे नुतनीकरण करण्यात आले. ज्या कामाला प्राधान्य देणे गरजेचे ते गाळ उपसा करण्याचे काम दुर्लक्षित केले असल्याचे मत इथले शेतकरी व्यक्त करतात.

    या तलावा पासून पाच किलोमीटरवर देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे. या कुर्लि धरणाचे पाणी एका बाजूला नदीत सोडले जाते. तर कालव्यांची कामे अर्धवट असल्याने जिथे पाण्याची गरज तिथे पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

      वाघेरी पियाळी या गावांच्या एका सीमेवर शिवगंगा नदी दुथडी भरून वाहते. तर दुसरीकडे या गावांत पाण्याचा दुष्काळ अशी स्थिती आहे. फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरील पाणी पाइपलाइन किंवा पाटाद्वारे या गावांतून जाणाऱ्या ओहोळात जोडले तर हे गाव सुजलाम सुफलाम होतील. पण यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची ती कोणाकडे दिसून येत नसल्याची भावना व्यक्त केली जातेय.

 वाघेरी पियाळी गावातील सुमारे शंभर दीडशे हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. यातील निम्म्या क्षेत्राला गेल्या दिड महिन्यांपासून पाणी नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेती सुकत चालली आहे. यावर्षी उशीरा झालेली ऊसतोड, लागणीला झालेला उशीर, त्यात अद्याप कारखान्यांकडून बील नाही, कष्ट करून डोळ्यासमोर जर शेती सुकत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न आहे. त्यात विहीरीचे तळ आटल्याने येत्या आठवडाभरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुर्लि धरणाचे पाणी आणण्यासाठी काही ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. पण लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याच राजकीय पक्षांची सहकार्य करण्याची भूमिका नाही. निवडणूक आली की ओहोळातील गाळ काढण्यापासून ते शिवगंगा नदीचे पाणी आठवडाभरात ओहोळात आणण्याचे आश्वासन दिले जाते. आणि निवडणूक झाली की ही आश्वासने पाण्यात बुडवली जातात, असाच अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनचा असल्याचे शेतकरी सांगतात. आज एकीकडे कोरोनाची लाट त्यामुळे लॉकडाऊन तर दुसरीकडे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा संकटात गाव सापडला आहे.

त्यामुळे जे आम्हाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करतील त्यांनाच मतदान केले जाईल असे इथला तरुण शेतकरी वर्गासह ग्रामस्थ महिला बोलून दाखवत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page