मालवण /-


जलजीवन मिशन योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यत पोचविण्यात सर्व लोकप्रतिनिधींबरोबरच सरपंच, ग्रामसेवक यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अन्य योजनाही तालुक्यात प्रभावीपणे राबविल्या गेल्यानेच जिल्ह्यात मालवण पंचायत समितीचे काम एक नंबरचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांनी येथे केले.
येथील पंचायत समितीस जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी भेट दिली. यावेळी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात त्यांनी कोविड तसेच जलजीवन मिशनअंतर्गतचा आढावा घेतला. यावेळी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, जेरॉन फर्नांडिस, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आदी उपस्थित होते तर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
तालुक्यातील कोविडचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात ३५८ सक्रीय रुग्ण असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना, सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी दिली. तालुक्यात काही ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविका सर्वेक्षण करत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी विचारणा केली असता सर्व आशा, अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. ६० वर्षावरील अंगणवाडी सेविकांना यातून वगळण्यात आले आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता यांचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी दिली. यावेळी आशा आणि अंगणवाडी सेविकांना ग्रामनिधीतून एकवेळ एक हजार रुपयांचे मानधन द्यावे अशा सूचना सौ. सावंत यांनी प्रशासनास दिल्या. माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी अभियान ५ ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येत असून या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे अशा सूचना गटविकास अधिकार्‍यांनी दिल्या. यावेळी तालुक्यातील विविध गावातील सरपंचांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जलजीवन मिशनअंतर्गत नळजोडणीचे १९ हजार ९७४ चे उद्दीष्ट असून मार्च अखेर ५४१९ कुटुंबांना नळजोडण्या दिल्या आहेत. १४ हजार ३७५ कुटुंबांना नळजोडण्या द्यावयाच्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत म्हणाल्या, जलजीवन मिशन ही वाडी वस्त्यांवरील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे विहित मुदतीत प्रस्ताव करता आले नाही. मात्र आता यात मुदतवाढ मिळाल्याने येत्या काही दिवसात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. धनगर वाड्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page