कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे ठेवावे भाग २ ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
सिंधुदुर्ग /-
कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती कमी होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते. ईश्वराला केेेलेल्या प्रार्थनेने आपल्याला अनन्यसाधारण बळ मिळते. प्रार्थनेने रोगनिवारण होते, हे आता आधुनिक विज्ञानानेही विविध प्रयोगांद्वारे मान्य केले आहे. आपले मनोबल आणि सकारात्मता वाढण्यासाठी प्रार्थनेचा अवलंब आपल्या जीवनात करावा. सध्याच्या प्रदूषित वातावरणातील हवेच्या शुध्दीसोबत विषारी वायू आणि किरणोत्सर्ग यांपासून रक्षण करणारा ‘अग्निहोत्र’ हा विधीही अवश्य करावा. सध्याच्या आपत्काळात अशा विविध उपायांचा अवलंब करून नियमित साधना करा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कोरोना वैश्विक महामारी : ‘मनाला स्थिर कसे करावे? भाग २’ या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 7827 लोकांनी पाहिला.
हरियाणा येथील वैद्य भूपेश शर्मा यांनी सांगितले की, ‘कोरोनाच्या महामारीत आपल्या आरोग्यासाठी तात्पुरते उपाय न करता आयुर्वेदातील सूत्रांचा सातत्याने आपल्या दिनचर्येत योग्य प्रकारे अवलंब केल्यास आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळ मिळणार आहे. ऑक्सिजन सिलिंडरच्या मार्फत शरीराला प्राणवायू (ऑक्सिजन) देणे, या तात्पुरत्या उपायांवर अवलंबून न राहता आपल्या आहारात शुध्द तेल, तूप यांसारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास शरीरातील वायू नियंत्रित राहतो. यासोबतच शरीरावर अभ्यंग (तेल) याचा उपयोग केल्यास प्राणवायूचा स्तर सुधारतो. शिळे अन्न न खाता योग्य आहार घेऊन नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकांनी धर्मपालन म्हणजे जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.’
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, ‘सध्याच्या काळात कोरोनाच्या विषाणूने ग्रासले असताना अनेक जण पुढाकार घेऊन लोकांना साहाय्य करत आहेत; मात्र याबरोबरच स्वार्थ साधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, औषधांचा काळाबाजार, नफाखोरी यांसह अनेक गैरप्रकार सुरू आहेत. हे गैरप्रकार उजेडात आणण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे. सध्याच्या काळात सर्वांनीच शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होण्यासाठी योग्य दिनचर्येचा नक्कीच लाभ होईल.