सिंधुदुर्गात ‘कोरोना’चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..!

सिंधुदुर्गात ‘कोरोना’चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..!


सिंधुदुर्ग /-

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम लस देण्याची घोषणा राज्य सरकारने मार्च महिन्यात केली त्यानुसार महिन्याच्या अखेरीस मोठा गाजावाजा करीत जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवातही झाली.जिल्हा रुंग्णालयात जाऊन अनेकांनी ‘कोव्हॅकसीन’ लस देण्यात आली.सर्वांची नोंदणी करण्यात येऊन मोबाईल क्रमांक घेण्यात आले.२८ दिवसानंतर तुम्हाला दुसरा डोस घेण्यासाठी  मोबाईलवर मेसेज येईल.मात्र मे महिना आला तरी डोस तर नाहीच आणि मेसेजही नाही.

पहिला डोस घेतलेले ज्येष्ठ नागरिक गेल्या १५ दिवसापासून जिल्हा रुंग्णालयात फोनवर चौकशी करून प्रत्यक्ष भेट देऊन कंटाळले मात्र दुसऱ्या डोस कुठे अडकला हे कोणीच सांगायला तयार नाहीत,यासंदर्भात जिल्हा रुंग्णालयात चौकशी केली असता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे बोट दाखवण्यात येते.’तुम्ही तिकडे चौकशी करा’ असे उत्तर मिळते.आरोग्य विभागात चौकशी केली असता आम्ही राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे,त्यासाठी गेले अनेक दिवस पाठपुरावा करीत आहोत,मात्र अद्याप त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नाही असे उत्तर देण्यात येते.एकूणच गेले काही दिवस हा ‘खो-खो ‘ खेळ सुरू आहे.

 खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एव्हाना प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर करायला हवे होते.याबाबत चौकशी केली असता तसे प्रसिद्धीपत्रक दिले असल्याचे थातुरमातुर उत्तर एका जबाबदार अधिकाऱ्याने दिले.

“आमच्याकडे ‘कोव्हीशिल्ड’ उपलब्ध आहे हवी असल्यास ती देण्याची व्यवस्था करता येईल” असे एका अधिकाऱ्याने सुचविले तेव्हा ‘तसे चालत असेल तर लेखी द्या ‘असे सांगताच हे अधिकारी काहीही बोलायला तयार नव्हते.त्यांनी हा विषय चक्क झटकून टाकला.एकूणच सारा पोरखेळ सुरू आहे.आणि कशाचेच गांभीर्य उरलेले नाही.जिल्हा रुंग्णालय आणि जि.प.चा आरोग्य विभाग यांच्यात आजही समन्वय नसल्याचेच पुन्हा एकदा समोर आले आहे.

 जिल्ह्यांतील ४७ हजार ज्येष्ठांना आतापर्यंत पहिला डोस देण्यात आला आहे अशी अधिकृत आकडेवारी सांगते.त्यापैकी फक्त १० हजार ज्येष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला.अद्यापही ५० हजार ज्येष्ठ नागरिक वंचित राहिले असून त्यांना पहिला डोस सुद्धा देण्यात आलेला नाही असावं अधिकृतरित्या सांगण्यात आले.जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे दीड लाख इतकी आहे.मात्र आरोग्य खात्यात चौकशी केली असता निश्चित आकडा कोणीच सांगायला तयार नाहीत.अशी जर परिस्थिती असेल तर या जिल्ह्याचे काही खरे नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानंतर ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या अंतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले असे सांगण्यात आले.मात्र या सर्वेक्षणाची माहिती आजमितीपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही ही आश्चर्याचीच नव्हे तर चीड-संताप आणणारी बाब आहे.जि. प.च्या आरोग्य विभागाने सहा महिन्यात केले काय असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्ह्याचेपालकमंत्री,लोकप्रतिनिधी ,जि. प.चे पदाधिकारी यांनी सर्वेक्षणाची माहिती घेतली का..? असेल तर ती लोकांसाठी जाहीर करायला नको काय.?

आज कोल्हापूरचे उदाहरण घ्या.एवढी मोठी लोकसंख्या(सुमारे ३८ लाख) असलेल्या या जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क आणि सज्ज आहेच शिवाय तिथल्या सर्व व्यवस्थेची माहिती कोणालाही एका ‘क्लीक’ वर उपलब्ध आहे.त्यामानाने आम्ही खूपच मागे आहोत.जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक किती..? त्यापैकी कोणाला कोणते आजार आहेत..? दुर्धर आजार असलेले कोण..? याचा संपूर्ण डाटा तयार आहे.शिवाय आरोग्य कर्मचारी जवळजवळ रोजच अशा सर्वांच्या प्रकृतीचा आढावा घेत असतात.भविष्य काळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करायची असेल तर याची आवश्यकता,गरज लक्षात घेऊनच कोल्हापूर जिल्हा प्रशासन,जिल्हा रुंग्णालय आणि जि. प.चा आरोग्य विभाग यांनी हे पाऊल उचलले आहे.अर्थात लोकांचीही साथ,सहकार्य त्यांना लाभलं आहे हे विशेष होय.जिल्ह्यात सुमारे ५ कोटी रुपयांची ‘रेमडीसीवीर’ मोफत देण्यात आली हे एकच उदाहरण पुरेसे आहे.

 सिंधुदुर्गात ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे हे तर उघडच आहे.सरकारने १८ ते ४५ वयोगटासाठी मोफत लसीकरण ही घोषणा केली.मोठा गवगवा करत जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली.मात्र आजची स्थिती काय तर अनेक लस संपल्याचे सांगण्यात आले.कधी येणार हे सांगायलासुद्धा कोणी तयार नाही. खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री,लोकप्रतिनिधी या सर्वांनी दौरे,उदघाटने,आरोग्य विषयक उपकरणे,साहित्य ,आदीचें वाटप करून फोटोसेशन करणे,तासनतास बैठका घेण्यापेक्षा ‘कोरोनाला ‘रोखण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे  आवश्यक आहे ते केले असते तर आज जिल्ह्यात चिंतेची परिस्थिती उद्भवलीच नसती.या सर्वातून राजकीय फायदा मिळेल की न मिळेल याचा विचार न करता ‘कोरोना’ ला कसे रोखता येईल, प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन आरोग्य यंत्रणा सक्षम,सुसज्ज कशी होईल,जिल्ह्याला जास्तीत जास्त लस कशी मिळेल,लसीकरण मोहीम अधिकाधिक व्यापक कशी होईल,हे पाहण्याची आज गरज आहे.आजच्या इथल्या अवस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल लोकांमध्ये तीव्र भावना असून त्या जरी जाणून घेतल्या,माहिती घेतली तरी पुरेसे आहे.अजूनही वेळ गेलेली नाही.

अभिप्राय द्या..