वेंगुर्ला /-
आंबा बागायतदारांच्या हितासाठी आणि त्यांनी काढलेल्या आंब्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाहतुकदार ट्रक मालक यांनी पुकारलेला संप तात्पुरता मागे घेतला आहे. परंतु दोन दिवसांत याचा योग्य निर्णय न झाल्यास वाहतुकदार ट्रक चालक – मालक संपावर जाणार असल्याचा पवित्रा आज सोमवारी झालेल्या सभेत घेण्यात आला.आंबा पेटी वाहतूक करताना १५० रुपये प्रति पेटी मागे मिळावा, यासाठी वाहतूकदार ट्रक चालक – मालक यांनी संप पुकारला होता. मात्र, वेंगुर्ला येथे आज माल वाहतुकदार, ट्रान्सपोर्टदार व आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी सध्या बागांमध्ये आंबे काढले असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वाहतूकदार ट्रक चालक-मालक यांनी ९० रुपये दरांनी पेटीची वाहतूक करण्यासाठी तडजोड केली आहे. सदरची तडजोड ही फक्त दोन दिवसांसाठी असून बुधवारी सायंकाळी ४ वाजण्यापर्यंत दराबाबत ठोस निर्णय न झाल्यास वाहतूकदार चालक-मालक संपावर जाणार आहेत.तसेच गाडीमध्ये आंबा पेटी एका जागेवर भरावी, गाडीला फिरती नसावी, दोरी बांधण्यासाठी गाडीमालक स्वखुशीने पैसे देतील ते हमालांनी घ्यावेत, गाड्या नंबरप्रमाणे भराव्यात, एक्सप्रेससाठी जाणारी गाडी सायंकाळी ६ वाजेर्यंत सोडण्यात यावी, लोकल वाहतुक वेळेच्या पुढे गेली तरी त्यांना पूर्ण भाडे मिळावे तसेच वेंगुर्ला तालुक्यातील गाड्यांना सुरुवातीला प्राधान्य द्यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी वाहतुकदार संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, रामदास पडते, शरद वालावलकर,श्री रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जैनू पडवळ, लता गुड्सचे जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे श्याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे गावडे, संदिप पेडणेकर, उदय चिचकर, अंकुश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य वाहतुकदार उपस्थित होते.