वेंगुर्ला /-
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या हागंदारीमुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होवून वेंगुर्ला शहराने ओडीएफ ++ प्लस प्लस मानांकन मिळविले आहे.वेंगुर्ले शहराने २०१६ पासून
हागंदारीमुक्त शहर महणून आपले सातत्य टिकविण्यात यंदाही यश मिळविले आहे.
“ओडीएफ प्लस प्लस मानांकित
हागंदारीमुक्त शहर म्हणजे ज्यात कोणतीहि व्यक्ती उघडयावर शौचास जात नाही. सर्व शहर वासियांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. तसेच सर्व सामुदायिक तथा सामुदायिक शौचालयापैकी २५ % शौचालये सर्वोत्तम दर्जाची आहेत. शहरात निर्माण होणाऱ्या सर्व मैलासाठीचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराचा स्वत:चा स्वतंत्र मैला व सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित आहे.शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगल नकाशावर(SBM TOILET) नोंदणीकृत आहेत.”
वरील निकषाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथकाने १५ व १६ मार्च रोजी वेंगुर्लेत अचानक धडक दिली होती. त्यांनी केलेल्या पाहणीत वेंगुर्ले बाजारपेठ, वेंगुर्ले बसस्थानक, कॅम्प परिसर, गिरपवाडा, कुबलवाडा, बंदर व मांडवी परिसर इत्यादी परिसराची तसेच सर्व सार्वजनिक शौचालये आणि वेंगुर्लेच्या सांडपाणी प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर या पथकाद्वारे केंद्राकडे अहवाल सादर करण्यात आला होता. वेंगुर्ला नगरपरिषदेने केलेले काम व हागंदारीमुक्त
शहराचा दर्जा टिकविण्यासाठी केलेले नियोजन कामी आले व केंद्राला मिळालेला अहवाल सकारात्मक असल्याने वेंगुर्ले शहराला ओडीएफ ++ प्लस प्लस शहर म्हणून प्रमाणित केले. शहराला ओडीएफ++ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाल्याने कचरामुक्त शहरासाठी देण्यात येणाऱ्या ५ स्टार मानांकन दर्जा मिळविण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे,अशी माहिती स्वच्छ भारत अभियान वेंगुर्ले शहर समन्वयक सुस्मित चव्हाण यांनी दिली.वेंगुर्ला शहरास ओडीएफ++ प्लस प्लस दर्जा प्राप्त होण्यास वेंगुर्ले शहरवासियांनी दिलेली साथ बहुमोल आहे. शहरवासियांच्या व लोकप्रतिनिधींच्या एकजूट व पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा वेंगुर्ले शहराच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेल्याने आपण सर्वांचे आभार मानत असल्याचे नगराध्यक्ष दिलिप उर्फ राजन गिरप यांनी सांगितले. त्याचप्रमाणे असेच सहकार्य करुन स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये वेंगुर्ले शहराला सर्वोlतम क्रमांक मिळविण्यास हातभार लावावा, असे आवाहन न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.