ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप..
दोडामार्ग/-
दोडामार्ग तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. पिकुळे तिठा ते उसप असा चार किलोमीटरच्या रस्त्याचे काम हे सध्या सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदार हे काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचे वारंवार लक्षात आणून देऊनही त्याचा प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार सुरूच आहे, याबाबत खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर यांनी संबंधीत काम निकृष्ट होत असून ते काम बंद केले आहे. त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जात रस्त्याची परिस्थिती पाहिली असता सदर रस्त्यावर डांबराचा वापर न करता खडीकरण केले जात होते यामुळे रस्ता योग्य रीतीने न बनवता केवळ धूळफेक करण्याचे काम संबंधित ठेकेदार करत असल्याचे ते म्हणाले.
याकडे संबंधित विभागही मलई खायला मिळत असल्याने डोळेझाक करत आहे. मात्र लोकांचा पैसा अशाप्रकारे धुळीत घालण्याचा या विभागाला कोणताही अधिकार नसून “नवसाने” होणारे हे रस्ते निकृष्ट दर्जाचे न करता चांगल्या प्रतीचे कारावेत अन्यथा आपला इंगा दाखवण्याचा इशारा देवेंद्र शेटकर यांनी दिला आहे.