कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी देवानंद कृष्णा ढेकळे यांनी पदाचा गैरवापर करुन ३ अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याबाबत दिलेल्या तक्रारीवर कारवाई न झाल्याने कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली हे २६ जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी देवानंद कृष्णा ढेकळे यांनी पदाचा गेरवापर करुन ३ अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रान्वये राज्यमंत्री, नगरविकास यांना विनंती केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने राज्यमंत्री, नगरविकास यांनी “सदर गंभीर प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी’ असे निर्देश दिले आहेत. तसेच, सदर प्रकरणी मंत्री, नगरविकास यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा”असे निर्देश दिले होते. श्री.अमित सामंत यांनी सादर केलेली तक्रार आणि याअनुषंगाने मंत्री, नगरविकास व राज्यमंत्री, नगरविकास यांनी दिलेले निर्देश विचारात घेता, सदर प्रकरणी चौकशी करुन आपल्या अभिप्रायासह अहवाल तात्काळ शासनास सादर करावा या मागणीसाठी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली उपोषण करणार आहेत.